विषबाधेने ९ शेळय़ा दगावल्या
By Admin | Updated: April 7, 2015 01:57 IST2015-04-07T01:57:07+5:302015-04-07T01:57:07+5:30
मातोळा तालुक्यातील घटना; दूषित पाणी पिल्याने झाली विषबाधा.

विषबाधेने ९ शेळय़ा दगावल्या
मोताळा (जि. बुलडाणा) : शेतकर्याच्या शेतातील पाण्याच्या हौदानजीक असलेल्या डबक्यातील दूषित पाणी पिल्याने विषबाधा होऊन ९ शेळय़ांचा मृत्यू झाला. यामध्ये पशुधन मालकाचे ५५ हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना तालुक्या तील सारोळापीर परिसरातील एका शेतातमध्ये ६ एप्रिल रोजी सकाळी ९:३0 वाजेदरम्यान घडली. सारोळपीर, ता. मोताळा येथील महादेव सदाशीव पवार यांच्याकडे लहान-मोठय़ा १८ शेळय़ा असून, गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीयांचा उदरनिर्वाह या शेळय़ांचा भरवशावर चालतो. सोमवारी नेहमीप्रमाणे महादेव पवार यांनी सारोळापीर परिसरात शेळय़ा चराईकरिता नेल्या होत्या. या परिसरात जनार्दन बोरसे यांचे शेत असून, जनावरांना पाणी पिण्यासाठी त्यांनी हौद बांधलेला आहे. या हौदावर पाणी पाजण्यासाठी महादेव पवार यांनी शेळय़ा आणल्या असता, हौदामध्ये पाणी कमी होते. त्यामुळे मोठय़ा शेळय़ांचे तोंड पाण्यापर्यंत पोहोचले; मात्र लहान शेळय़ांचे तोंड पाण्यापर्यंत पोहोचले नसल्याने हौदानजीकच्या साचलेल्या डबक्यातील दूषित पाणी शेळय़ांच्या पिण्यात आल्याने विषबाधा होऊन लहान-मोठय़ा ९ बकर्या १0 ते १५ मिनिटामध्ये मृत्यू पावल्या. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जैस्वाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत शेळय़ांची पाहणी केली. एका शेळीची किंमत ५ ते ६ हजार असून, यामध्ये अंदाजे ५५ हजारांचे नुकसान झाल्याचे सारोळा पीर येथील नागरिकांनी सांगितले.