एकाच रात्री ९ घरे फोडली

By Admin | Updated: June 27, 2014 00:38 IST2014-06-27T00:34:05+5:302014-06-27T00:38:13+5:30

पळशी बु. गावात २५ जूनचे रात्री चोरट्यांनी ९ जणांचे घरातून ५ लाखाचे वर ऐवज लंपास केला.

9 houses in one night | एकाच रात्री ९ घरे फोडली

एकाच रात्री ९ घरे फोडली

पळशी बु. : गावात काल २५ जूनचे रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री येथील ९ जणांचे घरातून ५ लाखाचे वर ऐवज लंपास केला. एकाच रात्रीत झालेल्या चोर्‍यांमुळे गावकर्‍यांमध्ये दहशत पसरली आहे.
पळशी बु. येथील संतोष श्रीराम हरणे यांच्या घरातून चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर आणखी काही ठिकाणी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर गावात एकूण ९ घरांचे कुलूप व कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरातील ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले. अज्ञात चोरट्यांच्या टोळीने पळशी येथील संतोष श्रीराम हरणे यांचे घराच्या गच्चीवरुन घरात निघणार्‍या जिन्याने घरात प्रवेश करुन कपाटातील ४ लाख रुपये रोख तर वासुदेव शंकर बाहेकर यांचे कुटुंबीय बाहेर झोपले असल्याची संधी साधून त्यांच्या घराच्या दरवाज्याचा कडीकोंडा उघडून १२ गॅ्रमची सोन्याची पोथ, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी तसेच लहान मुलांची दागिने असे जवळपास ५0 हजार रूपये, नंदकिशोर केशव धनोकार यांच्या घराचा कडीकोंडा तोडून त्यांच्या घरातून १0 ग्रॅम सोन्याची पोथ तसेच लहान मुलांचे दागिने असा जवळपास ३0 हजार रूपये, प्रमिला दशरथ सिरसाट ह्या गच्चीवर झोपले असल्याचे पाहून त्यांच्या गच्चीवरुन जीन्याने घरात येवून १0 हजार रूपये रोख, मुलांचे शैक्षणिक साहित्य, कागदपत्र व कपडे, किसन नारायण लभाने हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असता त्यांचे घरातून लहान मुलांचे दागिने व नगदी ३ हजार रूपये, महादेव धनोकार यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील डब्यामधून ७ हजार रूपये, लक्ष्मण बळीराम दुगने हे बाहेर झोपले असता त्यांच्या घराचा कडीकोंडा उघडून १0 हजार रूपये, गजानन विक्रम पल्हाडे यांच्या घरातून ४ हजार रूपये रोख तसेच बाळु महादेव ठोसरे यांच्या घरातून ३ हजार ७00 रूपये रोख असे मिळून जवळपास ५ लाख ५0 हजार रूपयांचा सोने-चांदीचे दागिने व रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. संतोष हरणे हे बकर्‍यांचे व्यापारी असल्याने आज गुरुवारी खामगाव येथील बाजार करण्यासाठी त्यांनी घरात ४ लाखाची रोख ठेवली होती. मात्र चोरट्यांनी त्यावर हात साफ केला.
घटनेचे गांभीर्य पाहून अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक यशवंत साळुंके व उपविभागीय पोलीस अधिकारी जी. श्रीधर यांनीही त्वरीत घटनास्थळी दाखल होवून पाहणी केली व ठसे तज्ज्ञ तसेच श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र श्‍वान चोरट्यांच्या माग दाखविण्यात अपयशी ठरले.

Web Title: 9 houses in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.