काळ्याबाजारात जाणारा ८५ हजारांचा गुटखा पकडला
By Admin | Updated: February 17, 2015 01:19 IST2015-02-17T01:19:23+5:302015-02-17T01:19:23+5:30
देऊळगावराजा येथे पोलिस अन्न व औषध प्रशासन यांची संयुक्त कारवाई.

काळ्याबाजारात जाणारा ८५ हजारांचा गुटखा पकडला
देऊळगावराजा (जि. बुलडाणा) : पोलीस प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासन यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत चिखली रस्त्यावरील डाक विभागाच्या कार्यालयाजवळ काळाबाजारात जाणारा ८५ हजाराचा गुटखा पकडल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १0.३0 वाजता घडली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शासनाने सर्वत्र गुटखा बंदी केली आहे. संपूर्ण गुटखा बंदीची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे; मात्र अपूर्ण कर्मचारी व अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे गुटखा विरोधी मोहिमेचे तिन-तेरा वाजले आहेत. याचाच फायदा गुटख्याचा काळाबाजार करणारे घेत असून, देऊळगावराजा तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर गुटख्याचा गोरखधंदा सुरु आहे. याबाबत मिळालेल्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक ए.एस.चौधरी यांनी शहरातील दस्तगीर खान मसुद खान (वय ४१) रा.चिखली यांच्या एम.एच.-२८ एबी ३0३७ या चारचाकी वाहनावर छापा टाकला. यावेळी विविध प्रकारचा तंबाकू डब्बे तसेच गुटखा असा एकूण ८५ हजार ४00 रुपयांचा माल जप्त केला. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी राजेश यादव यांनी अन्न व सुरक्षा मनोकायदे २00६ नुसार कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला.