बुलडाणा जिल्ह्यातील ७५0 वृद्ध कलावंत अडचणीत
By Admin | Updated: July 20, 2014 02:02 IST2014-07-20T01:26:08+5:302014-07-20T02:02:49+5:30
ऑनलाईन मानधनाकडे अधिकार्यांचे दुर्लक्ष.

बुलडाणा जिल्ह्यातील ७५0 वृद्ध कलावंत अडचणीत
बुलडाणा : वृध्द कलावंतांना शासनातर्फे मानधन ऑनलाईन मिळणार असून थेट कलावंतांच्या बँक खात्यात मानधन जमा होणार आहे. परंतु बुलडाणा जिल्हा परिषेतील अधिकार्यांचे ऑनलाईनच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष असल्यामुळे जिल्ह्यातील ७५0 वृध्द कलावंत अडचणीत आले आहेत.
शासनातर्फे वृध्द कलावंत, साहित्यिक मानधन योजना सन १९५४-१९५५ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे वृध्द कलांतांना आधार मिळाला आहे. शासनाकडून मार्च ते जून २0१४ याकालाधीचे बुलडाणा जिल्ह्यातील पात्र ७५0 लाभार्थ्यांना ३१ लाख ३१ हजार २00 रूपये मानधन देण्यात आले आहे. मात्र आता मानधन ऑनलाईन मिळणार आहे. याबाबत संबंधित गट विकास अधिकार्यांची बैठक आयोजित करून आपल्या तालुक्यातील पात्र वृध्द कलावंतांची यादी संबंधित ईमेल आयडीवर तात्काळ पाठविण्याचे पत्र सांस्कृतिक कार्य सहसंचालक यांनी बुलडाणा जिल्हा परिषद मुकाअ यांना दिले आहे. त्यांनी संबंधित अधिकार्यांना अंमलबजावणीसाठी आदेश दिले आहेत. मात्र पत्र येवून एक-दीड महिना झाल्यानंतर, वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतरही संबंधित अधिकार्यांनी याकडे प्रथम लोकसभा, त्यानंतर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहितेच्या नावाखाली दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अनेक वृध्द कलावंतांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.