टॉवरच्या नावाखाली ७५ शेतकर्यांना गंडविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:36 IST2017-09-07T00:36:04+5:302017-09-07T00:36:17+5:30

टॉवरच्या नावाखाली ७५ शेतकर्यांना गंडविले!
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : साखरखेर्डा आणि देऊळगावराजा परिसरातील शेतात मोबाइल टॉवर उभे करण्यासाठी शेतकर्यांकडून स्टॅम्प पेपरवर जागा भाडेतत्त्वावर लिहून घेऊन डिपॉझिटच्या नावाखाली एक लाखाहून अधिक रक्कम हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एजटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साखरखेर्डा येथील केरोसीन डीलर अब्दुल रशिद मो.हनिफ आणि देऊळगावराजा येथील संजय अन्ना खंदारे या दोघांनी चेन्नई येथील टॉवर इस्टालर कं पनीशी संबंध असल्याचे शेतकर्यांना सांगितले. ग्रामीण भागात ४ जी आणि ३ जी पीव्हीपी टॉवर उभे करण्यासाठी एक हजार घनमीटरची जागा हवी असल्याचे शेतकर्यांना सांगितले.
जमिनीचा पॉइंट व्यवहार करताना ती गावाजवळ असणे गरजेचे असून, जमीन भाड्याने देणार्या व्यक्तीने डिपॉझिट म्हणून १ लाख ५0 हजार देणे बंधनकारक असल्याचे सांगितले. त्या मोबदल्यात टॉवर उभे राहिल्यानंतर जागा भाडे म्हणून २५ हजार रुपये महिना आणि वॉचमनला १0 हजार रुपये महिना, असे दोन वाचमन ठेवण्यात येईल, असा बनाव करून १00 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लेखी लिहून देऊन त्या दोघांनी बुलडाणा जिल्ह्यातील ७५ शेतकर्यांसोबत आर्थिक व्यवहार केला. प्रत्येक शे तकर्याकडून १ लाख डिपॉझिट आणि इतर खर्च ५0 हजार रुपये, अशी रक्कम जानेवारी १६ मध्ये जमा केली. सहा महिन्यांत टॉवर उभे झाले नाही, तर डि पॉझिटमधील एक लाख परत करण्याची हमी त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिली. यामध्ये काशीनाथ गारोळे वरोडी, विजय उत्तमराव देशमुख पोफळ शिवणी, शिवाजी रामभाऊ सानप पिंपरी खंदारे, विजय जनार्दन बडे माळेगाव गौड, राहुल सदाशिव जगताप आडगावराजा, मधुकर भिकनराव देशमुख पोफळ शिवणी, विक्रम विजयराव देशमुख रा.कुट्टा ता.मानोरा जि.वाशिम, रोशन प्रकाशराव देशमुख रा.चिखली सरनाईक ता.रिसोड जि.वाशिम, बाबाराव नीळकंठराव देशमुख रा.तरोडी ता.रिसोड यासह साखरखेर्डा येथील तीन, चिखली येथील सेवानवृत्त नायब तहसीलदार यांच्या १७ पॉइंट, पिंपळगावराजा येथील एका व्यक्तीने १२ पॉइंट अशा प्रकारे ७५ व्यक्तींसोबत त्यांनी व्यवहार केला. आतापर्यंत २0 महिने होऊनही टॉवर उभे झाले नाही व डिपॉझिट परत मिळाले नाही.
त्यामुळे याबाबत साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये अशोक देशमुख यांनी तक्रार दाखल केली आहे.
या संपूर्ण व्यवहारात मी साक्षीदार असून, कंपनीचा चालक, मालक कोण आहे, याचा थांगपत्ता नाही. केवळ बनावट व्यवहार केल्याचे समजते. तरी नागरिकांनी या व्यक्तीपासून सावध राहावे.
-अशोक बाबाराव देशमुख, साखरखेर्डा.