७ हजार हेक्टरला अवकाळी पावसाचा फटका
By Admin | Updated: April 14, 2015 00:42 IST2015-04-14T00:42:42+5:302015-04-14T00:42:42+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील ६१६ गावे बाधित; कांदा, मका, भुईमुगासह फळपिकांचे नुकसान.

७ हजार हेक्टरला अवकाळी पावसाचा फटका
बुलडाणा : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने ९ ते १२ एप्रिल या कालावधीत जिल्ह्याला पुन्हा फटका दिला. या पावसाची ४६९.६0 मिमी एवढी नोंद करण्यात आली. या पावसामुळे जिल्ह्यातील कांदा, कांदा बी, मका, भुईमूग, केळी, भाजीपाला असे शेतपिके आणि लिंब, संत्रा, डाळिंब आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ७ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावरील पिके प्रभावित झाले असून, ६१६ गावे बाधित झाले.
यात खामगाव, जळगाव जमोद, बुलडाणा, मोताळा, नांदुरा, शेगाव या सहा तालुक्यात प्रत्येक ५0 टक्केच्यावर पिकांचे व इतर नुकसान झाले. या तालुक्यामध्ये कांदा आणि कांदा बी या पिकांचे ७0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर बुलडाणा, खामगाव, जळगाव जमोद या तीन तालुक्यात ३0 टक्क्यांपेक्षा जास्त फळबागेचे नुकसान आहे. जिल्ह्याचा विचार करता या तीन दिवसांच्या पावसामुळे ७ हजार ११६ हेक्टरवरील शेतपिके आणि ६३३ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे.
या अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त नुकसान जळगाव जमोद तालुक्यात झाले. गत तीन दिवसात तालुक्यात ७४ मिमी पाऊस पडला. या दरम्यान झालेल्या चक्रीवादळ व गाटपिटीमुळे १३६७ हेक्टरवरील शेतपिके व फळपिकांचे नुकसान झाले. तर ११९ गावांमध्ये घरांची पडझड होऊन कुटुंब उघड्यावर आली. तर त्या खालोखाल खामगाव तालुक्यात १२१५ हेक्टरवरील कांदा, कांदा बी, मका व इतर फळपिकांचे नुकसान झाले, तर ११0 गाव बाधित झाले.
गत जानेवारी महिन्यापासून जिल्ह्याला सहा वेळा अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे सोयाबीन, हरभरा, कापूस, कांदा, मका, तूर, मूग, शाळू आदी खरीप व रब्बी पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे प्रत्येक महिन्यात निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.