दुचाकीस्वाराजवळील ५0 हजार लुटले!
By Admin | Updated: March 28, 2017 01:40 IST2017-03-28T01:40:06+5:302017-03-28T01:40:06+5:30
मेहकर ते जानेफळ रोडवर फर्दापूर शिवारामध्ये मोटारसायकलवर जाणार्या एका इसमाकडून ५0 हजार रुपये लुटल्याची घटना

दुचाकीस्वाराजवळील ५0 हजार लुटले!
मेहकर, दि. २७- मेहकर ते जानेफळ रोडवर फर्दापूर शिवारामध्ये मोटारसायकलवर जाणार्या एका इसमाकडून ५0 हजार रुपये लुटल्याची घटना २६ मार्च रोजी घडली. याबाबत पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना तत्काळ अटक केली आहे.
रवींद्र ऊर्फ लक्ष्मण बळीराम दांडगे रा.सुलतानपूर हा ५0 हजार रुपये घेऊन आपल्या बहिणीला देण्यासाठी जानेफळला जात होता. रवींद्र दांडगेसोबत मोटारसायकलवर त्याचा मित्रसुद्धा होता. दरम्यान, फर्दापूर शिवारामध्ये नंदु माणिक पवार, आकाश बच्छू चव्हाण, नसीब बच्छू चव्हाण, जिरु बाबूराव पवार, लक्ष्मण मधुकर चव्हाण रा.पांगरखेड ता.मालेगाव, जि.वाशिम, विजय दिनकर तायडे रा. रिसोड यांनी रवींद्र दांडगे व त्याच्या मित्राची मोटारसायकल अडवून त्याला चाकूचा धाक दाखवून, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याजवळून ५0 हजार रुपये लुटले.
दरम्यान, रवींद्र दांडगे यांनी आरडा-ओरड केल्याने गावकर्यांनी धावून जाऊन या आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यासंदर्भात रवींद्र ऊर्फ लक्ष्मण बळीराम दांडगे रा.सुलतानपूर याच्या फिर्यादीवरुन वरील सहा जणांविरुद्ध पोलिसांनी अ.पं.नं.५९/१७ कलम ३४१, ३५९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
काही वेळातच केले आरोपींना अटक
मोटारसायकल अडवून व चाकूचा धाक दाखवून ५0 हजार रुपये लुटल्याची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी रामेश्वर व्यंजने, पोलीस निरीक्षक मोतीचंद राठोड, उपनिरीक्षक विलास मुंढे, ए.एस.आय. सोनुने व कर्मचार्यांनी गवंढाळा, कंबरखेड, कल्याणा परिसरात सापळा रचला तर त्या गावच्या पोलीस पाटलांनासुद्धा माहिती देण्यात आली होती. तसेच लोणार, साखरखेर्डा, जानेफळ, डोणगाव येथील पोलीस कुमकसुद्धा बोलाविण्यात आली होती. अखेर पोलिसांनी काही वेळातच सदर दरोडेखोरांना अटक करुन गुन्हा दाखल केला.