कांदा बीजोत्पादनात ५० टक्के घट
By Admin | Updated: April 13, 2017 00:56 IST2017-04-13T00:56:29+5:302017-04-13T00:56:29+5:30
सिंदखेड राजा- वातावरणातील कोरडेपणा, आलेले धुके व कमी होत असलेल्या मोहळाच्या मधमाशा, यामुळे कांदा बीजोत्पादनात ५० टक्के घट झाली आहे.

कांदा बीजोत्पादनात ५० टक्के घट
वातावरणाचा फटका : शेतकरी हवालदिल
काशिनाथ मेहेत्रे - सिंदखेड राजा
वातावरणातील कोरडेपणा, आलेले धुके व कमी होत असलेल्या मोहळाच्या मधमाशा, यामुळे कांदा बीजोत्पादनात ५० टक्के घट झाली आहे.
सतत दोन वर्षे दुष्काळ, गारपीट यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस पडला. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन ही पीके चांगली आली. तुरीच्या पिकाने तर उत्पादनाचा उच्चांक मोडला. शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कांदा बीजोत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली. कांद्याचे पीकही चांगले आले. मोठमोठी बोंड पडली; परंतु बीजोत्पादन झाले नसल्याचे नशिराबाद येथील शेतकरी नारायण मेहेत्रे, दिलीप कुंडलीक मेहेत्रे यांच्या शेतात निदर्शनास आले. उत्पादन खर्चसुद्धा वसूल होतो की नाही, या धास्तीने बळीराजा हवालदिल झाला आहे.
यावर्षी मूग, उडीद, सोयाबीन, कापूस तूर ही पिके चांगली आली; परंतु शासनाच्या शेतमाल आयातीच्या धोरणामुळे उत्पादन होऊनही बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे. खरिपामध्ये झालेले नुकसान रब्बीच्या पिकात भरून निघेल, या आशेने शेतकऱ्यांनी शाळू, गहू याची पेरणी केली व नगदी पीक म्हणून कांद्याची लागवड बीजोत्पादनासाठी केली. पाऊस सुरुवातीला चांगला पडला. त्यानंतर आजपर्यंत पाऊस आलाच नाही.
थंडी जास्त पडल्यामुळे शाळू ज्वारी उत्पादनात घट आली. कांद्याचे पीक चांगले आले. मात्र, हवामानाचा दुष्परिणाम, धुके व मधमाशांचे प्रमाण कमी झाल्यामुळे कांद्याचे बियाणे भरले नाही.