बुलडाणा पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ४७ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 11:14 IST2021-06-19T11:14:42+5:302021-06-19T11:14:48+5:30
Buldana water supply scheme : कामासाठी ४७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

बुलडाणा पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ४७ कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शहराची वाढती लोकसंख्या व रुरअर्बन भागाचा पडणारा बोजा पाहता खडकपूर्णा प्रकल्पावरून बुलडाणा शहर चार गावे पाणीपुरवठा योजनेतील दुसऱ्या टप्प्यातंर्गतच्या कामासाठी ४७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
या कामासाठी बुलडाण्याचे आ. संजय गायकवाड यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यानुषंगाने आता हा निधी लवकरच उपलब्ध होत आहे. हे काम पुर्णत्वास गेल्यास बुलडाणा शहरास दररोज पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. बुलडाणा शहराची आगामी काळातील लोकसंख्या विचारात घेऊन दहा वर्षापूर्वी खडकपूर्णा प्रकल्पावरून बुलडाण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी ११३ कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली होती. जीवन प्राधिकरणामार्फत त्याचे काम सुरू होते.
पहिल्या टप्प्यातील बहुतांश काम मार्गी लागले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांच्या कामाचा प्रश्न होता. त्यानुषंगाने त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. पालिकेच्या विशेष सभेत त्यानुषंगाने ४७.३४ कोटी रुपयांची यासाठी गरज असल्याचे सांगण्यात आले होते. तसा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला होता. आ. गायकवाड यांनी त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर २०१९ मधील या प्रस्तावास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.