जिल्ह्यातील ४.५ लाख अल्पभुधारक शेतकऱ्यांचे पिकर्ज माफ होणार!
By Admin | Updated: June 12, 2017 20:11 IST2017-06-12T20:11:44+5:302017-06-12T20:11:44+5:30
जुनी रक्कम जमा झाल्याशिवास नवे पिककर्ज नाही

जिल्ह्यातील ४.५ लाख अल्पभुधारक शेतकऱ्यांचे पिकर्ज माफ होणार!
विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असल्याची घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्यातील ४ लाख ५२ हजार ८७८ अल्पभुधारक शेतकऱ्यांचे १ हजार ४० कोटींचे पिकर्ज माफ होणार आहे. मात्र, अद्याप शासनाचे कोणतेही दिशानिर्देश आले नसल्यामुळे बँकेचे अधिकारी कर्जमाफी कशी द्यायची, याबाबत संभ्रमात आहेत.
गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह विविध पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. काँग्रेसने संघर्ष यात्रा काढली तर त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्राही काढली. संपूर्ण राज्यात विविध पक्षांच्यावतीने कर्जमाफीची मागणी करण्यात आली. त्यानंतर शेतकरी संपावर गेले. या सर्वांची फलश्रृती कर्जमाफीत झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज तातडीने माफ करण्याची घोषणा केली. जिल्ह्यात एकूण शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ६३ हजार १३८ असून, यापैकी ४ लाख ५२ हजार ८७८ शेतकरी अल्पभुधारक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख १५ हजार १०५ शेतकऱ्यांकडे १२९० कोटी रूपयांचे कर्ज आहे. यापैकी अत्यल्प भुधारक १ लाख १३ हजार ८४४ शेतकऱ्यांकडे ४३० कोटी, अल्प भुधारक ८२ हजार ४०३ शेतकऱ्यांकडे ६१० कोटी रूपये तर अन्य २ लाख ८५८ शेतकऱ्यांकडे २४९ कोटींचे पिककर्ज आहे. शासनाने सध्या केलेल्या घोषणेनुसार जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार २४७ अल्पभुधारक शेतकऱ्यांचे १ हजार ४० कोटींचे कर्ज माफ होणार आहे. सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याच्या विचारात असून, सरसकट पिक कर्जमाफी झाली तर २ लाख १७ हजार १०५ शेतकऱ्यांचे १२९० कोटी रूपयांचे कर्ज माफ होणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेती असून, गत चार पाच वर्षांपासून चांगले उत्पन्न झाले नाही. ज्यावेळी उत्पन्न झाले तर भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.