संग्रामपूर तालुक्यात एका वर्षात ४३ बालमृत्यू, आरोग्य व बालविकास प्रकल्पाचा ढिसाळ कारभार

By विवेक चांदुरकर | Published: April 14, 2024 04:59 PM2024-04-14T16:59:36+5:302024-04-14T17:00:03+5:30

संग्रामपूर तालुक्यात वर्षभरात ४३ बालकांचे मृत्यू झाले आहेत. यामध्ये २५ अर्भक तर १८ उपजत मृत्यूंचा समावेश आहे.

43 child deaths in one year in Sangrampur taluka, poor administration of health and child development project | संग्रामपूर तालुक्यात एका वर्षात ४३ बालमृत्यू, आरोग्य व बालविकास प्रकल्पाचा ढिसाळ कारभार

संग्रामपूर तालुक्यात एका वर्षात ४३ बालमृत्यू, आरोग्य व बालविकास प्रकल्पाचा ढिसाळ कारभार

संग्रामपूर: शासनाकडून बालमृत्यू, उपजतमृत्यूसह मातामृत्यूत घट व्हावी, या हेतूने पुर्वी डॉक्टर आपल्या दारी तसेच आता राष्ट्रीय आरोग्य अभियानासह जननी सुरक्षा योजना सुरू केल्या. मात्र, संग्रामपूर तालुक्यात या योजना कुचकामी ठरत असून बालमृत्यूंच्या प्रमाणात वाढ होत आहे. संग्रामपूर तालुक्यात वर्षभरात ४३ बालकांचे मृत्यू झाले आहेत. यामध्ये २५ अर्भक तर १८ उपजत मृत्यूंचा समावेश आहे.

१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या एका वर्षात २७.६७ टक्के मृत्यू झाले आहेत. एका गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. आरोग्यासाठी कोट्यवधींच्या निधीची उधळपट्टी सूरू असतांना बालमृत्यूंमध्ये पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येत नसल्याने गत काही वर्षांपासून बालमृत्यचे प्रमाण कायम आहे. त्यामुळे बालविकास प्रकल्प व आरोग्य विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गर्भवती मातांना येणाऱ्या सेवा तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. संग्रामपूर तालुक्यात पूरक पोषण आहार योजनेचा फज्जा उडाल्याने शासनाचा कोट्यवधीचा खर्च वाया जात आहे. गत काही दिवसांपूर्वी महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयामार्फत तालुक्यातील गरोदर माता व ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालकांसाठी पाकीटबंद धान्यांचा पूरवठा अत्यंत निकृष्ट असल्याचे उघडकीस आले. 

मल्टी मिक्स सिरीयल्स अँड प्रोटीन प्रीमिक्स, एनर्जी डेन्स मूंग डाळ खिचडी प्रीमिक्स पाकीट बंद पूरक पोषण आहाराचा पाकीट बंद धान्य निकृष्ट असल्याने शिजवल्यावर त्याचा रंग काळा पडत असून त्यातून दुर्गंधी येत असल्याने हा आहार खाण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच आरोग्याची स्थिती बदलावी यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. तरीही बालमृत्यूमध्ये घट होण्याऐवजी वाढतच असल्याने या अभियानावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

पूरक पोषण आहाराचे पाकीट बंद धान्याचे नमूने घेऊन प्रयोग शाळेच्या तपासणीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आले आहे. आहाराच्या दर्जाबाबत अहवाल प्राप्त झाल्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
- पी. एन. मानकर, बालविकास प्रकल्प अधिकारी, संग्रामपूर
 

Web Title: 43 child deaths in one year in Sangrampur taluka, poor administration of health and child development project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.