येनगाव येथे ३५ घरांना भीषण आग
By Admin | Updated: April 12, 2017 00:41 IST2017-04-12T00:41:05+5:302017-04-12T00:41:05+5:30
जळगाव जामोद : तालुक्यात ग्राम येनगाव येथे ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग भीषण स्वरूपाची होती.

येनगाव येथे ३५ घरांना भीषण आग
जीवितहानी टळली; घरगुती लाखोंचे साहित्य जळून खाक
जळगाव जामोद : तालुक्यात ग्राम येनगाव येथे ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग भीषण स्वरूपाची होती. भरदुपारी उन्हाच्यावेळी लागलेल्या या आगीत तब्बल ३५ घरे जळाली असून, ही सर्व कुटुंबे उघड्यावर आली आहेत. आगीत घरगुती सामान जळाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
येनगाव हे वडशिंगीपासून २ कि.मी. दक्षिणेस खेडेगाव असून, गावात झोपड्यांच्या घरात राहणारी कुटुंबे आहेत. अशा वेळी स्वयंपाक झाल्यानंतर कुणाच्या तरी चुलीमध्ये विस्तव राहिला व हवेने आग लागल्याचे बोलल्या जात आहे. ही आग दुपारी १२ वाजताच्या सुमारास लागली. यावेळी गावकरी तथा मडाखेड खुर्दवासी धावून आले. मडाखेड येथे आग विजविण्यासाठी टँकर बोलावण्यात आले; परंतु आग आटोक्यात येत नसल्याचे लक्षात येताच जळगाव नगर परिषदेची अग्निशमन गाडी बोलावण्यात आली. तसेच प्रसेनजित पाटील हे तत्काळ हजर होऊन त्यांनीही यंत्रणांना फोन करून बोलावले. जळगावचे ठाणेदार साळुंके, पोकाँ विश्वनाथ जाधवसह पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांनी घटनास्थळी येऊन आग विजविण्यास मदत केली. दुपारी २ वा. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
आगीची माहिती मिळताच जळगाव जामोद तहसीलकडून मंडळ अधिकारी एच.उकर्डे, तलाठी एस.पी. श्रीनाथ यांनी घटनास्थळी जावून प्राथमिक पाहणी केली, तर या कुटुंबियांच्या जळालेल्या घरांचा पंचनामा १२ एप्रिल रोजी करणार असल्याचे सांगितले. उघड्यावर आलेल्या कुटुंबियांची जेवणाची व्यवस्था गावकऱ्यांनी केली, तर त्यांना अन्नधान्य व चहाची व्यवस्था तहसीलकडून देण्याची माहिती दिली.
आग लागली त्या दरम्यान येनगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, जि.प.चे बांधकाम सभापती राजेंद्र उमाळे यांनीही भेट देऊन पाहणी केली.
या कुटुंबांना पोचली आगीची झळ
या आगीमध्ये ३५ घरांचे मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. त्यामध्ये रामहरी भारसाकळे, प्रदीप वाघ, एकनाथ वानखडे, आनंद वानखडे, संतोष दामोधर, बाबूराव सिरसाट, भगवान जवंजाळ, रवींद्र सिरसाट, राजेश जवंजाळ, ज्ञानशिल दाभाडे, श्रावण जवंजाळ, अरूण दाभाडे, मरी दाभाडे, मंगेश दाभाडे, विनायक जवंजाळ, दादाराव भारसाकळे, नीलेश दाभाडे, पांडुरंग भारसाकळे, विनोद भारसाकळे, शिवहरी भारसाकळे, शेषराव सिरसाट, प्रमोद सिरसाट, भरत इंगळे, समाधान इंगळे, नागोराव दाभाडे, जितेंद्र सिरसाट, अशोक दाभाडे, सुगदेव वानखडे, वासुदेव दाभाडे, धर्मकुमार सुरळकार, गंगाराम सिरसाट, सुनंदा दाभाडे, देवमन दाभाडे, रवींद्र दाभाडे, सोनाबाई दाभाडे यांचा समावेश आहे.
लाखोंचे घरगुती साहित्य, अन्नधान्य जळाले
या आगीमुळे घरांसह आजूबाजूच्या परिसरातील पराट्या, कुटार, गोठ्यांनीही पेट घेतला. त्यात ३५ घरांना चांगलीच झळ पोचली. या ३५ घरातील अन्नधान्य, कपडेलत्ते, गृहपयोगी भांडी, अंथरूण, पांघरूण यासह सर्व साहित्य जळून बेचिराख झाले. त्यामुळे हे सर्व ३५ कुटुंब उघड्यावर आली आहेत.