आरटीईच्या २१४२ जागांसाठी ३४३६ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:35 IST2021-04-04T04:35:36+5:302021-04-04T04:35:36+5:30
आरटीई प्रवेश प्रक्रियेची लॉटरी आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रवेशाची लॉटरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यासाठीचे नियोजन शालेय ...

आरटीईच्या २१४२ जागांसाठी ३४३६ अर्ज
आरटीई प्रवेश प्रक्रियेची लॉटरी आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रवेशाची लॉटरी एप्रिलच्या पहिल्या
आठवड्यात प्रसिद्ध करण्यासाठीचे नियोजन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत ३० मार्चपर्यंत जिल्ह्यातील एकूण २ हजार १४२ जागांसाठी ३ हजार ४३६ ऑनलाईन अर्ज भरण्यात आले आहेत.
विविध माध्यमांच्या, विविध शाळांमधील प्रवेशांसाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता ३ मार्च ते ३० मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. जिल्ह्यात आरटीई प्रवेशप्रक्रियेत यंदा २३१ शाळांनी नोंदणी केली असून, प्रवेशासाठी एकूण २,१४२ जागा उपलब्ध आहेत. त्या नोंदणीची मुदत संपल्यावर आता प्रवेशाची लॉटरी काढण्याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांनी ३ एप्रिलपर्यंत 'डुप्लिकेट फॉर्म रिमूव्ह' करण्याचे काम पूर्ण करावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. ३ एप्रिलनंतर फॉर्म रिमूव्ह करता येणार नाहीत, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आरटीई २५ टक्के या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत देण्यात येणारी शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारने तीन वर्षांपासून दिलेली
नाही. परिणामी, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश दिले जाणार नसल्याची भूमिका काही खासगी
शाळाचालकांनी घेतली आहे. काही खासगी शाळांनी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे सरकार शुल्क प्रतिपूर्ती देत नाही आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा म्हणून दबाव टाकला जात आहे. त्यामुळे या शाळांनी या प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.
आरटईअंतर्गत जिल्ह्यात शाळांची नोंदणी - २३१
जागा किती - २१४२
अर्ज किती - ३४३६
आता लक्ष लॉटरीकडे
आरटीईअंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता पालकांचे लक्ष निवड प्रक्रियेसाठी काढण्यात येणाऱ्या आरटीईच्या ऑनलाईन लॉटरीकडे लागले आहे. परंतु काही शाळांचा या प्रवेश प्रक्रियेवर असलेला बहिष्कार पाहता, आता लॉटरी घोषित झाल्यावर या शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्यास शासन काय पावले उचलणार, हा प्रश्नसुद्धा पालकांमधून उपस्थित होत आहे.