३३ पदे रिक्त असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा!
By Admin | Updated: June 23, 2016 23:22 IST2016-06-23T23:22:30+5:302016-06-23T23:22:30+5:30
नांदुरा येथील शिक्षकांची ३३ पदेरिक्त असल्यामुळे पालक वर्गामध्ये संताप.

३३ पदे रिक्त असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा!
किशोर खैरे / नांदुरा(जि. बुलडाणा)
नांदुरा पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागातील मुख्याध्यापक व शिक्षकांची ३३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक बालकांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतल्या जात असल्याने पालकांत चिंता व्यक्त होत आहे.
शासन निर्णयानुसार, बालकांना पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाचा कायदेशीर हक्क आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांमधील शिक्षणा नसल्यामुळे पालकांचा कल इंग्रजी शाळेकडे वळत असून, मराठी व उर्दू माध्यमाच्या ३३ शिक्षकांच्या जागाच रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मराठी माध्यमांच्या मुख्याध्यापकांची ३ पदे, पदवीधर शिक्षकांची १७ पदे, सहायक अध्यापकांची २ पदे रिक्त आहेत. उर्दू माध्यमाच्या मुख्याध्यापकांची ३ पदे, पदवीधर सहायक शिक्षकाची ८ पदे असे एकूण ११ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मराठी व उर्दू माध्यमांची एकूण ३३ पदे रिक्त असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी पडोळ यांनी दिली.
दरम्यान, मराठी माध्यमाच्या सहायक अध्यापकाची २ पदे अतिरिक्त असून, उर्दू माध्यमाच्या ३ शिक्षकांची पदेही अतिरिक्त ठरली आहेत.
नांदुरा तालुका हा दुष्काळग्रस्त, मागासलेला तालुका आहे. ग्रामीण भागात ११३ शाळांमधून प्राथमिक शिक्षणाची सोय जिल्हा परिषद मार्फत करण्यात आलेली आहे; तसेच इंग्रजी शाळांचे व खासगी शाळांचे प्रस्थ वाढू लागल्याने व त्याची शैक्षणिक फी गरीब शेतकरी व शेतमजूर भरु शकत नसल्याने आर्थिकदृष्ट्या विचार करून जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मुलांना शिक्षण देतात.