२८0 कोटींचा आराखडा मंजूर
By Admin | Updated: January 9, 2015 01:34 IST2015-01-09T01:34:23+5:302015-01-09T01:34:23+5:30
बुलडाणा जिल्हा नियोजन समितीची बैठक, आराखड्यात ४0 कोटींची भर.

२८0 कोटींचा आराखडा मंजूर
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यासाठी २८0 कोटी २१ लाख ७४ हजार रूपये खर्चाच्या वार्षिक प्रारूप आराखड्यास आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या आराखड्यात आणखी ४0 कोटीची भर टाकली जाणार असल्याचे सांगून जिल्ह्यासाठी अच्छे दिन आणणार असल्याचे संकेत आज पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महसूलमंत्री तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे हे होते. खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे, आमदार पांडुरंग फुंडकर, आ.राहुल बोंद्रे, आ.चैनसुख संचेती, आ. डॉ. संजय कुटे, आ. डॉ. संजय रायमुलकर, आ.अँड.आकाश फुंडकर, आ. डॉ. शशीकांत खेडेकर, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, मुख्य कार्यपालन अधिकारी ओमप्रकाश देशमुख उपस्थित होते. या बैठकीची माहिती देताना पालकमंत्री खडसे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून होणार्या धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी आता बायोमेट्रीक प्रणाली सुरू केली जाणार आहे. त्यासाठी ७५ लाखाची तरतूद केली असून, संपूर्ण जिल्ह्यासाठी दोन कोटीचा निधी लागणार आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधानगृह व बैठक व्यवस्था निर्माण केली जाईल. त्यासोबतच जिल्हास्तरावर महिला समुपदेशन केंद्रांची स्थापना केली जाणार असून, यासाठी ५0 लाखाची तरतूद केली आहे. ही व्यवस्था तालुकास्तरापर्यंंत नेणार आहे. जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृतीचे विशेष प्रयत्न केले जातील.
पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यासोबत अनेक वर्षांपासून ऋ णानुबंध असल्याने येथील प्रश्न व समस्यांची जाण असल्याचे सांगुन प्रत्येक प्रश्नावर सदस्यांच्या भावना जाणून घेतल्या, सर्वांंचे समाधान होईल असा प्रयत्न केला असल्याचे सांगीतले. अनेक योजनांना मंजुरी दिली असून, त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत. विकासासाठी आणखी ४0 कोटीचा निधी वित्त मंत्रालयाकडे मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.