खारपाणपट्टय़ातील शुद्ध पेयजलासाठी २२२ कोटींचा खर्च
By Admin | Updated: October 7, 2015 23:48 IST2015-10-07T23:48:20+5:302015-10-07T23:48:20+5:30
संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील १४0 गाव पाणीपुरवठा योजनेचे काम ५६ टक्के पूर्ण.
_ns.jpg)
खारपाणपट्टय़ातील शुद्ध पेयजलासाठी २२२ कोटींचा खर्च
जयदेव वानखडे / जळगाव जामोद (जि. बुलडाणा): खारपाणपट्टय़ामुळे संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची झालेली हेळसांड पाहता, उच्चाधिकार समितीच्या अहवालानुसार या दोन्ही तालुक्यातील १६६ गावांपैकी १४0 गावांमध्ये शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने २२२ कोटी २२ लाख ९१ हजार रुपये खर्च करून १४0 गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. सप्टेंबर अखेर या योजनेवर १२0 कोटी १६ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. दरम्यान, ही योजना मार्च २0१७ पर्यंत पूर्णत्वास नेण्यात येणार असून, या १४0 गावातील २0३0 ची चार लाख लोकसंख्या विचारात घेऊन योजनेवर सध्या काम केले जात आहे. वान प्रकल्पावरून ही योजना असून, ती पुर्णत्वास गेल्यास खारपाणपट्टय़ातील जळगाव जामोद शहरास जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील १४0 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या दोन्ही तालुक्यात क्षारयुक्त पाण्यामुळे सातत्याने किडनीच्या आजाराने नागरिकांचा मृत्यू होत आहे. त्यानुषंगाने या भागातील नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. २ डिसेंबर २0१३ मध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने या योजनेस मान्यता दिली होती. २0१४ मध्ये योजनेने आकार घेण्यास सुरुवात केली आहे. जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी या योजनेसाठी व्यक्तिगत स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यानुषंगाने आता योजनेचे जवळपास ५६ टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत २0११0१२ आणि २0१२-१३ च्या कृती आराखड्यात ही योजना प्रस्तावित करण्यात आली होती. २0३0 ची दोन्ही तालुक्यातील या गावांची ४ लाख ४ हजार ३२0 लोकसंख्या विचारात घेऊन ही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.