देऊळगावराजा तालुक्यातील २२ हजार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST2021-08-28T04:38:06+5:302021-08-28T04:38:06+5:30
खरीप पाठोपाठ मागील वर्षी रब्बी हंगामात सुद्धा १९ मार्च रोजी पावसाने कहर केला होता. मोठ्या प्रमाणात पाऊस व गारपीट ...

देऊळगावराजा तालुक्यातील २२ हजार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
खरीप पाठोपाठ मागील वर्षी रब्बी हंगामात सुद्धा १९ मार्च रोजी पावसाने कहर केला होता. मोठ्या प्रमाणात पाऊस व गारपीट झाल्याने पिकांची नासाडी झाली होती. यामध्ये गहू, हरभरा, शाळू, कांदा, मका, आंबा, संत्री, लिंबू या सह याशिवाय अन्य फळे व भाज्या यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे पिकांवरच नव्हे तर शेतकऱ्यांच्या कष्टावर ही पाणी फिरले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अगोदरच कोरोना संकट हाताला काम नाही तरी देखील शेतकऱ्यांनी उसनवारी करत कर्ज काढून पेरणी केली. मात्र, निसर्गाने अवकृपा झाली अन हाती तोंडी आलेला शेतकऱ्याचा घास हिसकवला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानीचे महसूल व कृषी विभागाच्या मार्फत पंचनामे करण्यात आले होते. त्यामुळे नुकसान भरपाई अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार देऊळगाव राजा तालुक्यातील २२१८० शेतकऱ्यांना १७ कोटी ७५ लाख ४२ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना काळात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. मागील वर्षी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात गारपीट अवकाळी पावसाचा तडाखा मोठ्या प्रमाणात तालुक्यातील अनेक गावांना बसला होता. यामध्ये हरभरा, तूर, मका, गहू, केळी याशिवाय अन्य फळबागा नेस्तनाभूत झाल्या होत्या. नुकसान भरपाईचे पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. त्यानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकाचे नुकसान झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा निधी वितरीत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये घेण्यात आला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याला २२ कोटी रुपये निधी वितरण करण्यास राज्याच्या महसूल व वन विभागाने मान्यता दिली आहे. यापैकी देऊळगावराजा तालुक्याला १८ कोटी रुपयाचा निधी वितरित झाला असून, ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होईल त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या गावांना मिळणार मदत
शिवणी आरमाळ,अंभोरा ,जवळखेड ,उंबरखेड, पिंपळगाव ,चिंचोली बुरकुल, सावंगी टेकाळे, निमगाव गुरु, आळंद, रोहणा, गोंदनखेड, गारखेड ,टाकरखेड भागीले, दगडवाडी ,मेहुणा राजा, गारगुंडी, सिंगाव जहागीर ,डोईफोडेवाडी, खल्याळ गव्हाण ,सुलतानपूर, चिंचखेड ,बायगावखु, मंडपगाव देऊळगाव मही ,वाकी ,नारायण खेड ,धोत्रा नंदाई ,सुरा, सरंबा, नागनगाव, डीग्रस, टाकरखेड वायाळ, अंढेरा, मेंडगाव ,पाडळी शिंदे ,सावखेड नागरे, खडका या गावांचा समावेश आहे.