२२ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम!
By Admin | Updated: May 16, 2016 01:27 IST2016-05-16T01:27:18+5:302016-05-16T01:27:18+5:30
बुलडाणा शहराचे तापमान ४३ अंशावर; नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन.

२२ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम!
बुलडाणा: राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट आली असून, जिल्हय़ातही या लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ मेपयर्ंत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यानंतर २२ ते ३१ मे या कालावधीत उष्णलहरी हळूहळू कमी होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
गत तीन ते चार दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर तापमानात वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी काळजी घ्यावी. दिवसा विशेषत: सकाळी १0 ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान आवश्यक काम नसल्यास घराबाहेर पडू नये. नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले आहे.
जिल्हय़ात उष्माघातापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आरोग्य विभागाची व्यवस्था सज्ज आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वार्डांमध्ये अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात आली असून, कूलर लावण्यात आले आहेत.
उष्णलहरींपासून झालेल्या अपायांवर मात करण्यासाठी औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी बाहेर जाणे अत्यावश्यक गरज असल्यास डोक्याला दुपदरी पांढरा रूमाल बांधावा, अंगात शक्यतोवर काळे व भडक रंगाचे कपडे घालू नये, सैल पांढरे कपडे घालावे, पायात पादत्राणे घालून चालावे. उन्हामध्ये फिरताना थोड्या थोड्या वेळाने सावलीमध्ये थांबावे. शेतमजूर व वीटभट्टीवर काम करणारे कामगार, रोजगार हमीवरील कामगार यांनी सकाळी व दुपारनंतर उशिरा अंगमेहनतीचे काम करावे, तसेच भरपूर पाणी प्यावे व अत्यावश्यक स्थितीत डोक्याला रूमाल बांधून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. झाडे यांनी केले आहे.
बुलडाण्याचा पारा @44
बुलडाणा शहरात गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा पारा हा वाढताच आहे. सतत ४३-४४ अंश सेल्सिअस तापमान राहत असल्याने भरदुपारी गर्दीचे रस्ते ओस पडतात. शहरातील या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण आहेत.