चाईल्ड लाईनचा २१२ बालकांना आधार
By Admin | Updated: November 30, 2014 23:17 IST2014-11-30T23:17:32+5:302014-11-30T23:17:32+5:30
बुलडाणा: एका फोन कॉलने संकट टाळले

चाईल्ड लाईनचा २१२ बालकांना आधार
बुलडाणा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धावून येणार्या या सेवांप्रमाणेच समाजातील संकटग्रस्त मुलांना आता चाईल्ड लाईन संस्थेच्या १0९८ या क्रमांकाचा आधार मिळाला आहे. जेथे शसकीय यंत्रणा पोहचण्यास काही वेळ लागतो, तेथे चाईल्ड लाईनचे स्वयंसेवक पोहचत आहेत. त्यामुळेच बुलडाणा जिल्ह्यात वर्षभरात २१२ मुलांमुलींना चाईल्ड लाईनमुळे आधार मिळाला आहे.
मध्यमवर्गीय व उच्चवर्गीय पालक आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात, त्यांचे लाडही नेहमीच पुरविले जातात. पण प्रत्येक कुटुंबातील मुलांच्या नशिबात असे लाड असेलच, याची शाश्वती नसते. त्यामुळे बर्यावेळा काही मुले कामाला जुंपली जातात, तेथे त्यांना मारझोड केली जाते. काही मुलांना दारूड्या बापाचा त्रास असतो, काही मुलेमुली लैगिंक अत्याचाराला बळी पडतात. त्यामुळे अशी मुले घरून पळून जाण्यास किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात.
संकटात सापडलेल्या अश्या मुलांना तत्काळ मदत मिळणे गरजेचे असते. याच उद्देशाने जिल्ह्यात बुलडाणा चाईल्ड लाईन संस्था सुरू करण्यात आली आहे. यासाठी १0९८ हा संपर्क क्रमांक ठेवण्यात आला. या क्रमांकावर आलेला कॉलवर ज्या भागातील, शहरातील व गावातील तक्रार असेल, तेथील सदस्य आणि समुपदेशकांना त्याबाबत माहिती दिली जाते व काही वेळातच चाईल्ड लाइनचे स्वयंसेवक घटनास्थळी पोहचतात व पिडीत बालकांना मदत करतात.