मोताळा नगरपंचायतीसाठी २१ नामांकन दाखल
By Admin | Updated: October 7, 2015 23:27 IST2015-10-07T23:27:17+5:302015-10-07T23:27:17+5:30
राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली नसल्यामुळे नामांकनाची प्रक्रिया संथ; गुरूवार ८ ऑक्टोबर नामांकनाचा शेवटचा दिवस.

मोताळा नगरपंचायतीसाठी २१ नामांकन दाखल
मोताळा ( जि. बुलडाणा) : नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली असून, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मोताळा नगरपंचायतीत बुधवारी २१ जणांनी नामांकन दाखल केले आहे. तर काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नसल्यामुळे नामांकनाची प्रक्रिया रखडली असल्याचे ७ ऑक्टोबर रोजी दिसून आले; मात्र गुरूवार ८ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असल्याने या एक दिवसात या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. मोताळा नगरपंचायतमध्ये १७ प्रभागासाठी आतापर्यंत २२६ नामांकन अर्जाची विक्री झाली आहे. बुधवारी नगरपंचायत निवडणुकीसाठी २१ जणांनी अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक ४, ८, १३ व १४ मधून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. प्रभाग क्रमांक १, २, ३, ५, ६, ७, ११, १५ व १७ मधून प्रत्येकी १ अर्ज दाखल झाला आहे. तर प्रभाग क्रमांक ९ मधून ४, प्रभाग क्रमांक १0 मधून ३, प्रभाग क्रमांक १२ मधून २, प्रभाग क्रमांक १६ मधून ३ असे एकूण २१ नामांकन दाखल झाले आहेत. *उमेदवारीअभावी नामांकनाची प्रक्रिया रखडली मोताळय़ात राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नसल्यामुळे नामांकनाची प्रक्रिया रखडल्याचे दिसून आले. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा गुरूवार हा शेवटचा दिवस असून, उरलेल्या एक दिवसात राजकीय पक्षांच्या उमेदवारांची गर्दी निश्चितच वाढणार आहे. मोताळय़ात काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस, भाजप आणि सेना या चार प्रमुख पक्षांमध्येच खरी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. या प्रमुख पक्षांची उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. उमेदवारी न मिळाल्यास नाराज कार्यकर्ते दुसर्या पक्षातून उमेदवारी मिळवून आव्हान उभे करतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.