२१ लाख रुपयांचा गुटखा केला नष्ट!
By Admin | Updated: May 31, 2017 00:32 IST2017-05-31T00:32:28+5:302017-05-31T00:32:28+5:30
अन्न, औषध प्रशासन विभागाची कारवाई

२१ लाख रुपयांचा गुटखा केला नष्ट!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जगभरात ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने आज ३० मे रोजी बुलडाणा नगरपालिका, बुलडाणा अर्बन सफाई अभियान यांच्या सहकार्याने हनवतखेड येथील डंपींग ग्राउंडवर २१ लाख १३ हजार १६ रुपए किमतीचा गुटखा जाळून नष्ट करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने जिल्ह्यात गत दीड वर्षात एकूण ७० धाडी टाकण्यात आल्या आहेत. या धाडींमध्ये एकूण ५८ लाख ८९ हजार ६६६ रुपये किमतीचा प्रतिबंधित खाद्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यापैकी २६ लाख ८१ हजार २५० रुपये किमतीचा साठा चिखली येथील नगरपालिकेच्या डंपींग ग्राउंड येथे नष्ट करण्यात आला. तसेच ११ लाख ४०० रुपये किमतीचा साठा मलकापूर येथे यापूर्वी नष्ट करण्यात आला.
३० मे रोजी झालेल्या कार्यवाहीत अन्न सुरक्षा अधिकारी भा. कि चव्हाण, सं. ल सिरोसीया व ग.वि माहोरे, न.प आरोग्य निरीक्षक गजानन बदरखे, बुलडाणा अर्बन सफाई अभियान पथक अनिल रिंढे, अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील चंद्रकांत खर्चे, प्र. वि ढोले, स.तो जाधव व सं.रा धकाते आदी सहभागी झाले होते.