राज्यासाठी १७ लाख क्विंटल बियाणे!
By Admin | Updated: May 6, 2015 00:52 IST2015-05-06T00:52:03+5:302015-05-06T00:52:03+5:30
राज्यातील १४९.४३ लाख हेक्टर क्षेत्रासाठी पेरणीचे नियोजन केले

राज्यासाठी १७ लाख क्विंटल बियाणे!
अकोला : येत्या खरीप हंगामात कृषी विभागाने राज्यातील १४९.४३ लाख हेक्टर क्षेत्रासाठी पेरणीचे नियोजन केले आहे. बियाणे बदल दरानुसार १६ लाख ६४ हजार ११४ क्विंटल बियाण्यांची गरज असताना, प्रत्यक्षात या एकूण क्षेत्रासाठी लागणार्या विविध बियाण्यांच्या मागणीपैकी १७ लाख १0 हजार ९२0 क्विंटल बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), राष्ट्रीय बियाणे महामंडळ तसेच खासगी कंपन्या आणि शेतकर्यांजवळील बियाण्यांचा समावेश आहे. त्यामुळे यावर्षी बियाण्यांचा तुटवडा भासणार नसल्याचा दावा कृषी अधिकार्यांनी केला. यावर्षी १४९.४३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ४0 लाख हेक्टर बीटी कापूस आणि ३९ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. याकरिता एकूण ८६,0१७ क्विंटल बीटी कापूस, तर १0,३६,५१५ क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार आहे. या नगदी पिकांनंतर धान हे राज्यातील तिसर्या क्रमाकांचे पीक असूून, कोकण आणि विदर्भातील १४.९२ लाख हेक्टर क्षेत्रासाठी २,११,५१३ क्विंटल बियाणे अपेक्षित आहे. खरिपात तूर या पिकाचे क्षेत्र ११.४३ लाख हेक्टर आहे. या तुरीसाठी ६३,३३८ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. संकरित ज्वारीचे क्षेत्र नऊ लाख हेक्टर आहे. या क्षेत्रासाठी ६८,३२५ क्विंटल बियाणे लागणार असल्याने ज्वारीचे बियाणे शेतकर्यांना मिळणार आहे. संकरित बाजरीचे क्षेत्रही राज्यात नऊ लाख हेक्टर आहे. या बाजरीच्या क्षेत्रासाठी २३,२४0 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होईल. याचसोबत खरिपात मूग, उडीद या डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घेतले जाते. राज्यात मूग ५.३४ लाख, तर उडिदाचे क्षेत्र ४.४७ लाख हेक्टर आहे. याकरिता २६,0७१ हजार मूग, तर उडिदाचे ३४,८८२ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. मका या पिकाचे क्षेत्र राज्यात ७.८७ लाख हेक्टर आहे. या पिकाकरिता १,२९,१00 लाख क्विंटल बियाणे अपेक्षित आहे. सुधारित ज्वारी राज्यात १.३९ लाख हेक्टरवर घेण्यात येणार आहे. यासाठी २६५0 क्विंटल बियाणे लागणार असून, सुधारित बाजरीचे क्षेत्र २.४५ लाख हेक्टर आहे. याकरिता ७,९३0 क्विंटल बियाणे लागेल. खरिपात २.९८ लाख हेक्टर क्षेत्रावर भुईमूग घेतला जातो. त्यासाठी १८,६२५ क्विंटल बियाणे अपेक्षित आहे. तिळाचेही क्षेत्र 0.७0 हेक्टर असून, सुधारित कापसाचे क्षेत्र हे 0.५0 हेक्टर आहे. तिळाचे १,११४ क्विंटल, तर संकरित कपाशीचे १६00 क्विंटल बियाणे लागणार आहे.