सहा गावांच्या भूसंपादनासाठी मिळाले १६६ कोटी
By Admin | Updated: November 4, 2015 02:52 IST2015-11-04T02:52:15+5:302015-11-04T02:52:15+5:30
अमरावती येथे सिंचन अनुशेष बैठकीत राज्यपालांनी दिले तत्काळ निर्देश.

सहा गावांच्या भूसंपादनासाठी मिळाले १६६ कोटी
खामगाव: जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी असलेल्या जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम निधीअभावी रखडले आहे. त्याचा फटका प्रकल्पाच्या कामाला बसत आहे. ही बाब जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी मंगळवारी अमरावती येथे राज्यपालांनी घेतलेल्या आढावा बैठकीत प्रकर्षाने मांडल्याने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पहिल्या टप्प्यातील सहा गावांच्या भूसंपादनासाठी १६६ कोटी रुपयांचा निधी तत्काळ निर्गमित करण्याचे निर्देश विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला दिले आहेत. अमरावती येथे ३ नोव्हेंबर रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पश्चिम वर्हाडातील सिंचन अनुशेषाबाबत अमरावती विभागातील पाचही जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पांच्या कामासाठी अपेक्षित निधी वेळेत उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले असता तातडीने राज्यपालांनी हा निधी निर्गमित करण्याचे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला निर्देशित केले आहे. बुलडाणा जिल्ह्याचा सिंचन अनुशेष ५ हजार कोटींच्या वर गेला आहे. तो भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील दहा प्रकल्प वेळ र्मयादेत पूर्ण करण्यात येणार आहे. पश्चिम विदर्भातील असे १0२ प्रकल्प येत्या काळात पूर्ण करण्यात येणार असून, त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दहा प्रकल्पांचा समावेश आहे. राज्यपालांच्या सिंचन अनुशेष निर्मूलन कार्यक्रमांतर्गत या प्रकल्पांचा समावेश आहे.