१८ जागांसाठी १६१ उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: May 6, 2015 00:29 IST2015-05-06T00:29:52+5:302015-05-06T00:29:52+5:30
कृउबास निवडणूकीत २0४ उमेदवारांनी घेतली माघार.

१८ जागांसाठी १६१ उमेदवार रिंगणात
चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या विक्रमी ३६५ नामांकन अर्जापैकी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २0४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने उर्वरित १६१ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून या संस्थेची सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी तब्बल ३६५ अर्ज दाखल झाले होते. यातील नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ५ मे रोजी ३६५ पैकी २0४ नामांकन अर्ज मागे घेण्यात आले आहे. यामुळे निवडणूक रिंगणात आता १८ जागांसाठी १६१ उमेदवार आपले नशीब आजमावणार असून, ६ मे रोजी निवडणूक लढविणार्या उमेदवारांना चिन्ह वाटप केल्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर २४ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यानुषंगाने विविध राजकीय पक्ष धुरीनांनी पक्षीय जोडे बाहेर काढून सहकारातील महत्त्त्वाचे सत्ताकेंद्र काबीज करण्यासाठी हातमिळवणी करून पॅनलची मोर्चेबांधणी केली असून, कोणाच्या पॅनलमध्ये कोणती नावे जाहीर होतात, याकडे लक्ष लागले आहे.