१६ शिक्षकांना जात पडताळणीचे आदेश
By Admin | Updated: November 24, 2015 01:24 IST2015-11-24T01:24:01+5:302015-11-24T01:24:01+5:30
जात पडताळणीसाठी ३0 नोव्हेंबर शेवटची तारीख.

१६ शिक्षकांना जात पडताळणीचे आदेश
अशोक इंगळे / सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): पंचायत समितीसह बुलडाणा जि.प. मधील शिक्षण विभागात १६ शिक्षक स.अ.विमुक्त जाती भटक्या जमाती या जातीच्या प्रमाणपत्रावर शिक्षक म्हणून कार्यरत आहे; परंतु बुलडाणा जिल्ह्यात ही जातच अस्तित्वात नसल्याने भामटा राजपूत जातीचे प्रमाणपत्र असलेल्या शिक्षक कर्मचार्यांनी अद्यापपर्यंंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्या शिक्षकांना जात पडताळणीसाठी ३0 नोव्हेंबर शेवटची तारीख देण्यात आली आहे. या तारखेच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांना बडतर्फ करणार असल्याचे आदेश जि.प.शिक्षण विभागाने बजावले आहेत. बुलडाणा जि.प.सह शासकीय, निमशासकीय पदावर कार्यरत होण्यासाठी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र, जातीचे बनावट प्रमाणपत्र असे विविध बनावट प्रमाणपत्र मिळवून काही युवक नोकरीत सामिल झाले. ज्यावेळी जात प्रमाणपत्र सादर करण्याची वेळ येते, त्यावेळी संबंधित अधिकार्यांना लाखोचे आमिष दाखवून जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. खोटे, बनावट दस्ताऐवज तयार करणारी टोळी बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय असल्याचे या अगोदर निदर्शनात आले आहे. सिंदखेडराजा तालुक्यात भामटा राजपूत ही जात अस्तित्वात नसताना एका शिक्षकाने जात प्रमाणपत्र जोडले असल्याने त्यांनाही जात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश बजावले आहेत. तसेच बुलडाणा जिल्ह्यात विमुक्त जाती भटक्या, जमाती ही जात अस्तित्वात नसल्याने बुलडाणा जिल्हा परिषदमध्ये १६ शिक्षकांना अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र अकोला येथून मिळाले नाही. त्यांनी ३0 नोव्हेंबर पर्यंंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची १ डिसेंबरपासून सेवा समाप्त करण्याचे आदेश मिळू शकतात, अशीही माहिती पंचायत समितीमधून मिळाली आहे. १६ शिक्षकांपैकी काही शिक्षकांनी २३ नोव्हेंबरला किरकोळ रजा टाकून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात धाव घेतली असून, सेवा समितीवर स्टे मिळविण्यासाठी अपील दखल करणार असल्याची माहिती आहे.