अवैध रेती वाहतुकीची १६ वाहने पकडली
By Admin | Updated: July 10, 2015 00:10 IST2015-07-10T00:10:28+5:302015-07-10T00:10:28+5:30
संग्रामपूर तालुक्यातील प्रकार; २ लाख ४४ हजार दंड शासनाच्या तिजोरीत जमा.

अवैध रेती वाहतुकीची १६ वाहने पकडली
संग्रामपूर (जि. बुलडाणा) : तालुक्यातील वानखेड येथील वान नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक करणार्या १६ वाहनांना गुरुवारी पकडण्यात आले. या वाहनधारकांकडून प्रत्येकी १५ हजार २५0 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तालुक्यातील वानखेड येथील वान नदीपात्रात बर्याच दिवसांपासून रेतीचे अवैध उत्खनन करून चोरट्या मार्गाने वाहतूक सर्रास सुरू होती. महसूल विभागाने कारवाई करण्यापूर्वीच सदर वाहने घटनास्थळाहून पलायन करण्यात पटाईत होते. ही बाब लक्षात ठेवून महसूल विभागाने सापळा रचला. त्यानुसार, येथे नव्यानेच रुजू झालेले व पदोन्नतीवर तहसीलदार म्हणून पदभार घेतलेले तहसीलदार डी.व्ही. वाहुरवाघ हे मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या ताफ्यासह गुरुवारी पहाटे वान नदीपात्रात पोहोचले. त्याठिकाणी १0 टिप्पर व सहा टॅक्टर अशा एकूण १६ वाहनांपैकी काही वाहनांमध्ये रेती भरलेली होती व काही वाहने रेती भरण्याच्या प्रतीक्षेत उभी होती. या ताफ्याने ताबडतोब तामगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तामगाव पोलिसांनी विनाविलंब घटनास्थळी धाव घेऊन महसूल विभागाच्या कारवाईत सहभाग घेतला. त्यानंतर सदर वाहने तहसील कार्यालयात आणण्यात आली. तहसील कार्यालयात ही वाहने आणल्यानंतर प्रत्येक वाहनधारकाकडील रॉयल्टीची चौकशी करण्यात आली. रॉयल्टी मिळालेली नाही म्हणून प्रत्येक वाहनधारकाकडून १५ हजार २५0 रुपये या प्रमाणे एकूण २ लाख ४४ हजार दंड वसूल करण्यात आला. या धडक कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणार्या वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे. रेती वाहतूक करणार्यांवर संग्रामपूर तालुक्यात आतापर्यंत सर्वांत मोठी कारवाई असल्याचे समजते. तहसीलदार डी.व्ही. वाहुरवाघ, मंडळ अधिकारी इंगळे, भिसे, पवार, धमाळ तसेच तलाठी परिहार, रंगदळ, जाधव यांच्यासह ताफ्यातील इतर तलाठी व पोलीस कर्मचारी सौदागर व त्यांचे सहकारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.