महिनाभरात १४ शेतक-यांच्या आत्महत्या
By Admin | Updated: December 4, 2014 00:53 IST2014-12-04T00:53:54+5:302014-12-04T00:53:54+5:30
नव्या सरकारवर शेतकरी आत्महत्यांचे सावट : हवालदिल शेतक-यांना हवा आधार.

महिनाभरात १४ शेतक-यांच्या आत्महत्या
बुलडाणा : सुगीचा हंगाम सुरू झाल्यावर शेतकर्यांच्या घरात शेतीमालाचे उत्पन्न येते, खरिपाच्या हंगामात लावलेला पैसा शेतमाल विकुन हिशेब जुळविला जातो. यावर्षी मात्र खरिपाचा हंगाम पुर ता हातातून गेल्यामुळे सुगीचा हंगाम हा शेतकर्यांसाठी आत्महत्येचा हंगाम ठरला आहे. १ नोव्हेंबरपासून २ डिसेंबरपर्यंत तब्बल १४ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २८ ते २९ नोव्हेंबरच्या ४८ तासात तब्बल ५ शेतकर्यांनी जीवनयात्रा संपविल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे समोर आले आहे.
२८ नोव्हेंबरपासून पुढील ४८ तासातच पाच शेतकर्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असून, त्यामध्ये २८ नोव्हेंबर रोजी खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथील रामकृष्ण गावंडे, २९ नोव्हेंबर रोजी बुलडाणा तालुक्यातील देऊळघाटचे विष्णू वानखडे, शेगाव तालुक्यातील जवळा येथील शिवाजी जवळकार, लोणार तालुक्यातील गंधारी येथील गुलाब रामसिंग जाधव, तर ३0 नोव्हेंबर रोजी चिखली तालुक्यातील पांढरदेवचे पांडुरंग चवरे यांचा समावेश आहे. काल २ डिसेंबर रोजी जवळा येथीलच गणेश मुरलीधर कान्हेरकर (वय ३२) या शेतकरी पुत्राने सकाळी ८ वाजताच्या दरम्यान गुरांच्या गोठय़ात विष प्राशन केले.
जिल्ह्यात मागील १४ वर्षात १ हजार ५९९ शेतकर्यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केल्या. त्यापैकी शासनाच्या निकषाप्रमाणे पात्र ठरलेल्या ६१0 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत देण्यात आली, तर ९६८ शेतकर्यांच्या कुटुंबीयांना विविध कारणान्वये मदत नाकारण्यात आली. या आत्महत्यामध्ये आजारपणा, व्यसनाधिनता, अपघात, बेरोजगारी, घरगुती भांडणो आदी कारणांमुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्यांचा समावेश आहे. यावर्षी खरि पामध्ये उशिरा आलेला पाऊस व परतीच्या पावसाने दिलेली जोरदार हजेरी यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.