१३८ गावांना पाणीटंचाईची झळ!

By Admin | Updated: June 25, 2016 00:55 IST2016-06-25T00:55:00+5:302016-06-25T00:55:00+5:30

१0 टक्के पावसानंतरही १५२ टँकर्स सुरू: प्रकल्पांनी गाठला तळ!

138 villages suffer from water scarcity! | १३८ गावांना पाणीटंचाईची झळ!

१३८ गावांना पाणीटंचाईची झळ!

विवेक चांदूरकर / बुलडाणा
पावसाळा सुरू होऊन महिना उलटला असला तरी मुबलक पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडेच आहेत. पाणीटंचाईची धग अजूनही कायम असून, अजूनही १३८ गावांमध्ये १५२ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
गत तीन वर्षांपासून अल्प प्रमाणात पाऊस होत असल्याने यावर्षी जलप्रकल्पांनी तळ गाठला. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. हवामान खात्याने यावर्षी लवकर व मुबलक प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविल्यामुळे जून महिन्यात पाणीटंचाईचे संकट दूर होईल, अशी अपेक्षा होती; मात्र जिल्ह्यात २४ जूनपर्यंत केवळ ८६.00 मिमी पाऊस असून, ही टक्केवारी ९.५९ आहे. दहा टक्के पाऊस पडल्यावरही प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढली नसून, पाणीटंचाई कायम आहे. जिल्ह्यात अकरा तालुक्यात सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासोबतच जिल्ह्यात ५६९ गावांमध्ये ७७६ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पाणीटंचाई निवारण्यासाठी ४८ गावांमध्ये तात्पुरत्या पुरक नळ योजना सुरू करण्यात आल्या. यापैकी १९ गावातील १९ योजना मंजूर असून, १६ गावातील योजना पूर्ण झाल्या आहेत. एका गावातील योजना प्रगतीत आहेत. जिल्ह्यात मेहकर तालुक्यात सर्वात जास्त २६ गावांमध्ये २८ टँकर सुरू आहेत तर बुलडाणा तालुक्यात २४ गावांमध्ये ३३ टँकर, तसेच सिंदखेड राजा तालुक्यातील २४ गावांमध्ये २९ टँकर, मोताळा तालुक्यात ७ गावात ७ तर खामगाव तालुक्यात सहा गावात सहा टँकर सुरू आहेत.
जून महिना संपत आला तरी चांगला पाऊस झाला नसल्यामुळे पाणीटंचाईचे संकट कायम आहे. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर हाहाकार माजणार असून, हे संकट अधिकच गडद होणार आहे. शेतकर्‍यांसह सर्वच जण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.

Web Title: 138 villages suffer from water scarcity!