येऊलखेड गावात होणार १३0 शेततळे
By Admin | Updated: February 14, 2015 01:47 IST2015-02-14T01:47:51+5:302015-02-14T01:47:51+5:30
जलयुक्त शिवार ; ३0 शेततळय़ांचे प्रस्ताव तयार.

येऊलखेड गावात होणार १३0 शेततळे
बुलडाणा : शेगाव तालुक्यातील येऊलखेड या खारपाणपट्यातील गावामध्ये जलयुक्त शिवार योजनेतून तब्बल १३0 शेततळी करण्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाने आखला आहे. या प्रस्तावातील ३0 तळय़ांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, येणार्या महिन्याभरात या शेततळय़ांचे काम सुरू होणार आहे. जलयुक्त शिवारमध्ये सिंचन व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण अशा दोन्ही संकल्पनेच्या पूर्तीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. येऊलखेड या गावाची लोकसंख्या ९५६ असून, भौगोलिक क्षेत्र ९७७ हेक्टर आहे. या क्षेत्रापैकी ८४८ हेक्टर क्षेत्र हे वहितीखाली असून यापूर्वी सदर गावाची निवड कोरडवाहू शाश्वत शेती अभियानातही करण्यात आली होती. गाव हे खारपाणक्षेत्रात येत असल्याने या परिसरात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच शेततळे निर्माण करून या गावासाठी जलक्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.