१२६५ पालकांनी केली पुस्तके परत; आपण कधी करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST2021-05-10T04:35:07+5:302021-05-10T04:35:07+5:30
बुलडाणा : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी गतवर्षीची ...

१२६५ पालकांनी केली पुस्तके परत; आपण कधी करणार?
बुलडाणा : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी गतवर्षीची पुस्तके परत करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना केले आहे़ या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १२६५ पालकांनी पुस्तके परत केली आहेत. वितरित झालेल्या पुस्तकांच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे़ त्यामुळे इतर पालकांनीही पुस्तके परत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे़
पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याबाबत राज्याच्या झालेय शिक्षण विभागाने ८ डिसेंबर २०२० रोजी शासन निर्णय निर्गमित केला. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी काही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांची जपणूक योग्यरितीने करतात. त्यांना सुस्थितीत ठेवतात. अशा पाठ्यपुस्तकांचे संकलन करून त्याचा पुनर्वापर केल्यामुळे पुढील वर्षी फेरवाटप करणे शक्य होते. शिवाय पुनर्वापरामुळे काही प्रमाणात कागदाची बचत होते. हा उद्देश ठेवून शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा पथदर्शी प्रकल्प शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार शाळा व गटसाधन केंद्राच्या वतीने कार्यवाही सुरू आहे.
कागदाच्या बचतीतून हाेणार झाडांचे संवर्धन
बुलडाणा जिल्ह्याप्रमाणेच महाराष्ट्रात वाटप केलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी २० टक्के जमा करून वापरण्याचे नियाेजन आहे़ शासनाचे तसे आदेशही आहेत. गडचिरोली जिल्ह्यात जि.प., न.प. व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण २ लाख ७६ हजार ८९५ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली आहेत.
पुढील वर्षासाठी २० टक्के पुस्तकांचा पुनर्वापर हाेणार आहे़ तसेच २ लाख ६१ हजार ४३६ विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे़. शाळा बंद असल्याने पुस्तके परत घेण्यासाठी कसरत करावी लागत आहे़
पालक म्हणतात
गेल्या वर्षभरापासून शाळा बंदच आहेत़ त्यामुळे पाठ्यपुस्तके परत करता आली नाही़ शाळा सुरू झाल्यानंतर सर्वच पुस्तके परत करू़ तसेच इतर पालकांनीही पुस्तके परत करण्याची गरज आहे़
गाैतम इंगळे, पालक
शासनाने पुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा घेतलेला निर्णय याेग्य आहे़ या निर्णयाचे स्वागतच आहे़ शाळा बंद असल्याने पुस्तके परत करता आली नाहीत़ शाळा सुरू झाल्यानंतर पुस्तके परत करु़
अमाेल पहुरकर, पालक
शासनाने २० टक्के पुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयानुसार शिक्षकांना पुस्तके परत घेण्याच्या सूचना केल्या आहेत़ आतापर्यंत १२६५ पालकांनी पुस्तके परत केली आहेत़ इतर पालकांनीही पुस्तके परत करण्याची गरज आहे़ शाळा बंद असल्याने पुस्तके जमा करुन घेण्यात अडचणी येत आहेत़
सचिन जगताप, प्रभारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प़ बुलडाणा