बुलेट ट्रेनसाठी लागणार १२४५.६१ हेक्टर जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST2021-07-23T04:21:35+5:302021-07-23T04:21:35+5:30
बुलडाणा : देशातील प्रस्तावित सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरपैकी महत्त्वपूर्ण असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या (बुलेट ट्रेन) ...

बुलेट ट्रेनसाठी लागणार १२४५.६१ हेक्टर जमीन
बुलडाणा : देशातील प्रस्तावित सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरपैकी महत्त्वपूर्ण असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या (बुलेट ट्रेन) डीटेल प्रोजेक्ट रिपोट तयार करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. येत्या ३ ते चार महिन्यांत तो तयार होईल. दरम्यान, ७३९ किमी लांबीच्या या कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी राज्यातील दहा जिल्ह्यांतील १ हजार २४५.६१ हेक्टर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे.
समृद्धी महामार्गासाठी संपादित कराव्या लागणाऱ्या जमिनीच्या तुलनेत अत्यंत कमी जमीन या प्रकल्पासाठी लागणार असल्याचे बुलडाणा येथे सामाजिक व पर्यावरणीय प्रभवाच्या संदर्भाने झालेल्या जनसुनावणीनंतर स्पष्ट झाले आहे.
बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बुलेट ट्रेनमुळे पडणाऱ्या सामाजिक आणि पर्यावरणीय प्रभावाच्या संदर्भाने २२ जुलैरोजी जनसुनावणी घेण्यात येऊन शेतकरी, विविध क्षेत्रांतील जाणकारांची मते जाणून घेण्यात आली. अनुषंगिक मते मुंबई-नागपूर हा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना अंतर्भूत केली जाणार आहे. या कॉरिडॉरसंदर्भाने झालेली ही राज्यातील पहिली जनसुनावणी (पब्लिक हेअरिंग) आहे. यामध्ये प्रस्तावित बुलेट ट्रेनचा मार्ग कसा राहणार आहे, त्यात कोणत्या बाबी अंतर्भूत राहतील, याचे एक प्रेझेंटेशनही करण्यात आले.
या बैठकीस मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाचे सामाजिक विकास विभागाचे सहायक व्यवस्थापक श्याम चौगुले, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आणि निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी दहा जिल्ह्यांतील २८ तालुक्यांतील ३८७ गाव शिवारांतून ही बुलेट ट्रेन धावेल, असे सांगण्यात आले. ३५० किमी कमाल वेगाने ही ट्रेन धावणार असून, साधारणत: २५० किमी तिचा सरासरी वेग राहील. त्यामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर ही ट्रेन ३ तास ३० मिनिटात कापेल. ७५० प्रवासी क्षमता या ट्रेनची असेल. डीपीआर तयार झाल्यानंतर दिल्ली येथील हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनला तो सादर करण्यात येईल.
--४१४ हेक्टर खासगी जमीन--
या प्रकल्पासाठी दहा जिल्ह्यांतील १२४५.६१ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यामध्ये ४१४ हेक्टर जमीन ही खासगी असून, ८३१.८९ हेक्टर शासकीय आणि वन जमिनीचा समावेश असणार आहे. गंमत म्हणजे बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या सुमारे १२०० हेक्टर जमिनीएवढीच जमीन राज्यातील दहा जिल्ह्यांत संपादित करावी लागणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करावी लागणार असल्याच्या गैरसमजाला त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.
-- ५८ फूट जमिनीच संपादित करावी लागणार--
समृद्धी महामार्गालगत समांतर पातळीवर ५८ फूट अर्थात १९ मीटर जमीनच संपादित करावी लागणार आहे. बुलेट ट्रेनला ज्या १४ ठिकाणी थांबा आहे, तेथे साधारणत: २५ मीटरपर्यंतच जमीन संपादित करावी लागेल, असे यावेळी बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
-जिल्हानिहाय संपादित होणारी जमीन-
नागपूर जिल्ह्यात ५९.०३ हेक्टर, वर्धा १०६.६९, अमरावती १२८.७७, वाशिम १७०.४६, बुलडाणा १५२.१०, जालना ७४.९९, औरंगाबाद १६७.९६, अहमदनगर ५१.५०, नाशिक १८९.५८ आणि ठाणे जिल्ह्यात १४४.५३ हेक्टरप्रमाणे जमीन संपादित करण्याचे प्रस्तावित आहे.