रेती चोरी करणारी ११ वाहने ताब्यात
By Admin | Updated: April 8, 2017 00:27 IST2017-04-08T00:27:03+5:302017-04-08T00:27:03+5:30
शेगाव तहसीलदारांची धडक कारवाई : १ लाख ७० हजार रुपयांचा दंड

रेती चोरी करणारी ११ वाहने ताब्यात
शेगाव: शेगाव तालुक्यातील हरासी न झालेल्या रेतीघाटांवर जाऊन रेतीची चोरी करणाऱ्या रेतीमाफियांविरुद्ध शुक्रवारी तहसीलदार गणेश पवार यांनी धडक मोहीम राबविली. या मोहिमेत सायंकाळपर्यंत ११ वाहने ताब्यात घेण्यात आली असून या वाहनधारकांना १ लाख ६९ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
शेगाव तालुक्यातील अनेक भागातील रेतीघाट तांत्रिक कारणांमुळे हरास झाले नाहीत. यामुळे रेती चोरट्यांनी या रेतीघाटांवरून वाहनांद्वारे रेती चोरण्याचा सपाटा लावला होता. याबाबतची तक्रार तहसीलदार गणेश पवार यांना प्राप्त होताच त्यांनी शुक्रवारी एक विशेष पथक तयार करून सकाळपासून डोंगरखेड व इतर रेती घाटांवर धाडी टाकल्या.
यामध्ये टाटा ४०७ क्रमांक एमएच ३७-५३६४ मालक हरिदास अरबट, एमएच २८ बी ३१७३ मालक नारायण मारोती जमाव, एमएच २८ बी ९५०८ शे. जमीर शे. बशीर रा. कवठळ, एमएच १४ एझेड ०१०८ मालक शे. सरवरखा, एमएच ३० एव्ही ०७५१ मालक राजेश जगदेव खडे, एमएच ३० जे ९१४२ रितेश अग्रवाल, एमएच ३० एबी ९६३७ मालक गणेश सपकाळ, एमएच ३० ए आर ५८२५ सचिन पांडे, एमएच ३० जे ७०३२ मंगेश ठाकरे, एचएच ३० सीएच ०८३२ पांडुरंग तुंबडे, एमएच ३० जे ५८७० सुभाष ठाकरे अशा एकूण ११ वाहनांना ताब्यात घेण्यात आले. या वाहनांमधील बहुतांश वाहने ही अकोला जिल्ह्यातील असल्याचे समजते. तहसीलदार गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या पथकामध्ये मंडळ अधिकारी आर.बी. दीक्षित, तलाठी के.के. तायडे, ए.जी. डाबेराव, एन.बी. जाधव आणि कोतवाल प्रवीण तायडे यांनी ही कारवाई पूर्ण केली. जप्त करण्यात आलेली वाहने शेगावच्या तहसील कार्यालयात लावण्यात आली असून या ११ वाहनांवर १ लाख ६९ हजार ४०० रुपये दंड ठोठावण्यात आला. रेती चोरट्यांविरुद्ध कारवाईला आणखी गती देण्यात येणार असून आता वाहनचालकांसह वाहन मालकांविरुद्धही कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.