१0८ सेवेचे मूल्यमापन होणार!
By Admin | Updated: February 20, 2016 02:14 IST2016-02-20T02:14:20+5:302016-02-20T02:14:20+5:30
सांख्यिकी कार्यालयाचे सर्वेक्षणास १ एप्रिलपासून होणार प्रारंभ.

१0८ सेवेचे मूल्यमापन होणार!
खामगाव: आपत्कालीन मृत्यूचे प्रमाण कमी करून ते २0 टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी शासकीय स्तरावर विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी एक १0८ क्रमांकाची टोल फ्री रुग्णवाहिकेची सेवा आहे. या सेवेच्या माध्यमातून आपत्कालीन मृत्यू कमी झालेत का, याबाबत राज्यभरातील १0८ टोल फ्री (आपत्कालीन वैद्यकीय सेवा) सेवेचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्यावतीने या मूल्यमापनासाठी प्रत्येक लाभार्थीकडून माहिती घेत सर्वेक्षण केले जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही १0८ टोल फ्री रुग्णसेवा राज्यात दोन वर्षांपूर्वी सुरू झाली. पुण्यातील भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) यांच्यावतीने ही आपत्कालीन वैद्यकीय सेवा बुलडाणा जिल्ह्यात सुरू आहे. सध्या जिल्ह्यात आपत्कालीन वैद्यकीय सेवेकरिता २३ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. १ एप्रिल २0१४ ते ३१ मार्च २0१५ या कालावधीत जिल्ह्यातील ६ हजार ७६८ जणांनी या वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतला.