बुलढाणा जिल्ह्यात लम्पीमुळे दाेन दिवसांत १० जनावरांचा मृत्यू; ५६७ जनावरे झाली बरी
By संदीप वानखेडे | Updated: September 20, 2022 17:18 IST2022-09-20T17:17:56+5:302022-09-20T17:18:27+5:30
१६६१ जनावरे बाधित, सर्वच तालुक्यात शिरकाव

बुलढाणा जिल्ह्यात लम्पीमुळे दाेन दिवसांत १० जनावरांचा मृत्यू; ५६७ जनावरे झाली बरी
बुलढाणा : लम्पी स्किन आजाराने सर्वच तालुक्यांत शिरकाव केला असून, दाेन दिवसांत आणखी १० जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा २५ वर गेला असून, एकूण १ हजार ६६१ जनावरे बाधित झाले आहेत. औषधोपचाराने ५६७ गुरे आजारातून बरी झाली आहेत.
गत काही दिवसांपासून जिल्ह्यात गुरांच्या लम्पी स्किन आजाराचा माेठ्या प्रमाणात शिरकाव हाेत आहे. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यांत हा आजार पसरला असून, १८ ते २० सप्टेंबर दरम्यान तब्ब्ल १० गुरांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. तसेच बाधित गुरांचा आकडा दीड हजाराच्या वर गेला आहे.
दाेन दिवसांत ५३८ गुरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गुरांवर औषधाेपचार करण्यात येत आहे. आतापर्यंत औषधोपचाराने ५६७ गुरे बरी झाली आहेत. जिल्ह्यातील १२४ गावांतील गुरे लम्पीने ग्रासली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ७२ हजार ६०० लसीचे डाेस उपलब्ध आहे. तसेच ७६ हजार ८१७ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
३ लाखांच्या वर गुरांचे हाेणार लसीकरण
जिल्ह्यात लम्पीचा वाढता शिरकाव पाहता, पशुसंवर्धन विभागाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यातील ३ लाख ७६ हजार ४११ गुरांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. आतापर्यंत ७६ हजार ८१७ गुरांचे लसीकरण करण्यात आले आहे. २ लाख ७२ हजार ६०० डाेस सध्या उपलब्ध झाले आहेत.