१ हजार ४४३ परीक्षार्थींनी दिली चालक पदाची परीक्षा
By Admin | Updated: May 4, 2015 01:17 IST2015-05-04T01:17:34+5:302015-05-04T01:17:34+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या ७ हजार ७६९ चालकाच्या रिक्त पदासाठी झाली परिक्षा.

१ हजार ४४३ परीक्षार्थींनी दिली चालक पदाची परीक्षा
बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या ७ हजार ७६९ चालकाच्या रिक्त पदासाठी रविवार ३ मे रोजी ३३ हजार ५00 उमेदवारांनी परीक्षा दिली. बुलडाणा जिल्ह्यात १३८ चालक पदासाठी १ हजार ४४३ उमेदवारांनी परीक्षा दिली. एसटी बस चालकांची राज्यात सुमारे ७ हजार ७६९ पदे कित्येक महिन्यांपासून रिक्त आहेत. मागील काही वर्षांपासून चालकाची पदभरती झाली नव्हती. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावरच एसटीचा डोलारा सुरू होता. आता राज्यातील चालक पदाची भरती सुरू केली. या भरतीसाठी १६ फेब्रुवारीला ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानंतर २४ मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. राज्यभरात ७ हजार ७६९ चालक पदांसाठी ३ मे रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात रिक्त असलेल्या चालक पदासाठी १ हजार ८२२ उमेदवारांना लेखी परीक्षेला बोलाविण्यात आले होते. चिखली आणि बुलडाणा येथील परीक्षा केंद्रावर झालेल्या लेखी परीक्षेसाठी १ हजार ४४३ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ३७९ उमेदवार गैरहजर होते. ही परीक्षा पुणे येथील एका खाजगी संस्थेने घेतल्यामुळे परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.