पोषण आहाराचे १ कोटी ४३ लाख थकले
By Admin | Updated: April 20, 2017 00:04 IST2017-04-20T00:04:08+5:302017-04-20T00:04:08+5:30
२१३ शाळांची स्थिती : जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक त्रस्त

पोषण आहाराचे १ कोटी ४३ लाख थकले
उद्धव फंगाळ - मेहकर
शासनाने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून पोषण आहार सुरु केला आहे. विद्यार्थ्यांसाठी ही योजना जरी चांगली असली, तरी शासनाच्या या योजनेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २१३ शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे जवळपास १ कोटी ४३ लाख ३९ हजार रुपये थकले आहेत. त्यामुळे सर्वच शाळेचे मुख्याध्यापक त्रस्त झाले आहेत.
जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शासनाने पोषण आहार, पुरक आहार योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या वर्ग १ ते ८ वर्गातील विद्यार्थ्यांना दररोज पोषण आहार दिला जातो. शासनाने सुरु केलेली ही योजना विद्यार्थ्यांसाठी लाभदायक आहे; मात्र ही योजना काही दिवसांपासून कुचकामी ठरत आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी मुख्याध्यापकांना तारेवरची कसरत करावी लागत
जिल्हा परिषदेच्या २१३ शाळेचे पोषण आहाराचे जुलै २०१६ पासून जवळपास १ कोटी १७ लाख १५ हजार ५९१ तर स्वयंपाकी व मदतनिस यांचे आॅक्टोबर २०१६ पासूनचे मानधन २६ लाख, २४ हजार रुपये शासनाकडे थकले आहेत. त्यामुळे सध्या मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक त्रस्त झाले आहेत. शासनाने लवकरात लवकर पोषण आहाराचा पैसा वाटप करण्याची मागणी होत आहे.
उधारीवर घेत आहेत सामान
मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या २१३ शाळेचे पोषण आहाराचे बिले गेल्या ९ महिन्यापासून थकल्याने भाजीपाला व इतर सामान मुख्याध्यापकांना उधारीवर घ्यावे लागत आहे. जवळपास ९ महिन्यापासून बिले न मिळाल्याने आता संबंधित दुकानदार उधार देत नसल्याने अनेक मुख्याध्यापकांना तारेवरची कसरत करुन सामान आणून विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवावा लागत आहे.