युवकांना नाट्याचे वेड लावणारे रंगधर्मी प्रदीप राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:06 AM2017-10-02T00:06:11+5:302017-10-02T00:06:37+5:30

मित्रवर्य प्रदीप राणे यांच्या एकांकिकांच्या पुनरावलोकनानिमित्त १ आणि २ आॅक्टोबरला ‘प्रयोग मालाडने’ महोत्सव आणि स्पर्धा आयोजित केली आहे त्यासाठी ‘प्रयोग मालाड’ या संस्थेचे, त्यांचे उत्साही कार्यकर्ते

Pradeep Rane, a fiancé of the drama of youth, has made a big difference | युवकांना नाट्याचे वेड लावणारे रंगधर्मी प्रदीप राणे

युवकांना नाट्याचे वेड लावणारे रंगधर्मी प्रदीप राणे

Next

- प्रा. कमलाकर सोनटक्के
मित्रवर्य प्रदीप राणे यांच्या एकांकिकांच्या पुनरावलोकनानिमित्त १ आणि २ आॅक्टोबरला ‘प्रयोग मालाडने’ महोत्सव आणि स्पर्धा आयोजित केली आहे त्यासाठी ‘प्रयोग मालाड’ या संस्थेचे, त्यांचे उत्साही कार्यकर्ते, हितचिंतकाचे आणि या उपक्रमात प्राथमिक आणि अंतिम स्पर्धेत सहभागी कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शक आणि संस्थाचालक यांचे मी अभिनंदन करतो.

प्रदीप राणे यांनी १९७०-८० या काळात वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या शैलीच्या अनेक एकांकिका लिहून सादर केल्या. राणेंनी आपल्या बहुतांश एकांकिका स्वत:च दिग्दर्शित केल्या. प्रत्येक एकांकिका त्यांनी केवळ स्पर्धेसाठीच लिहिली असे नाही. त्या स्पर्धेसाठी लिहिल्या असे म्हटले तरी त्या महाविद्यालयीन, तसेच त्याकाळी प्रचलित बँकांमधील, कार्यालयीन स्पर्धेव्यतिरिक्तही लिहिल्या. त्यांच्या एकांकिका कुठल्या एका महाविद्यालयासाठी, संचासाठी किंवा कलाकार संचाला समोर ठेवून, रंगमंचीय ठोकताळे बांधून युक्त्या-प्रयुक्त्यांची जोडबांधणी करून लिहिल्या किंवा सादर केल्या नाहीत. त्यांच्या बहुआयामी प्रतिभेने एकांकिकेला नवी झळाळी मिळवून दिली.
राणे त्यांच्या प्रत्येक एकांकिकेचा विषय, आशय, घटनाक्रम, भाषा, चरित्र-चित्रण आणि अंतिम उद्देश हा भिन्न असायचा. त्यात एक रसरशीत ताजेपणा असायचा. पाश्चात्त्य न-नाट्यांचा आणि ब्रेख्तपासून तो युगो बेट्टीच्या नाटकांचा आणि बेकेटपासून आयनेस्कोच्या नाटकाचा बडेजाव त्याकाळी मिरवला जात असला तरी राणेंच्या नाटकांवर त्या सहप्रवाहाचा जरासुद्धा प्रत्यक्ष परिणाम झालेला दिसत नाही. तरीही त्यांच्या एकांकिकांमध्ये एक सळसळते, आधुनिक, भविष्यवादी जीवनदर्शन घडायचे एवढे मात्र नक्की.
प्रदीपच्या बहुसंख्य एकांकिकांना वेगवेगळ्या स्पर्धांमधून पुरस्कार मिळाले, त्या एकांकिकांचा थोडाफार गवगवा झाला; पण पुढे फारसे काही झाले नाही; किंबहुना त्याचे फार काही व्हावे, अशी अपेक्षाही तेव्हा नसायची. मला वाटते प्रयोग संपल्यानंतर सादर केलेल्या एकांकिकांच्या संपूर्ण संहिता स्वत: लेखकांकडेसुद्धा संग्रहित नसायच्या. त्या मिळवताना लेखक आणि ‘प्रयोग मालाड’च्या संस्थाचालकांना कितीतरी प्रयास पाडले असतील. ‘प्रयोग मालाड’तर्फे प्रदीप राणे यांच्या एकांकिका महाराष्टÑातील वेगवेगळ्या केंद्रांवरील संस्थांसाठी प्राथमिक फेरीत सादर केल्या जाणार आहेत. राणेंच्या नाट्यप्रतिभेचे आजच्या काळात पुनर्मूल्यांकन करून नवे अर्थ शोधण्याची त्यांची क्षमता आहे. दुसरी जमेची बाब म्हणजे प्रदीप राणेंच्या बºयाच एकांकिका या प्रश्न उभे करतात आणि त्यांची उत्तरे वाचक, सादरकर्ते प्रेक्षकांसाठी मुक्त सोडतात. प्राथमिक फेरीमधील हा कलासंवाद अनेकार्थाने उपकारक ठरण्याची शक्यता आहे.
राणे यांच्या ‘वर्कशॉप’, ‘अ‍ॅश इज बर्निंग’, ‘चिऊताई चिऊताई दार उघड’, ‘इंद्रधनुष्य’, ‘युरेका युरेका’, ‘स्वगत स्वगते’ आदी एकांकिका नंतरच्या काळातील आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीच्या तरुण पिढीला वेडावले. अनेक स्पर्धांमधून, महाविद्यालयांतून, बँकांमधून त्यांच्या या नाटिकांचे प्रयोग होत राहिले. त्यांच्या जवळपास साºयाच नाटिकांना पहिले, दुसरे पुरस्कार मिळत राहिले. त्यापेक्षा मला एका वेगळ्या गोष्टीचे विशेष अप्रूप वाटते की, त्यांच्या वरीलपैकी बºयाच एकांकिका हिंदी, गुजराथी भाषांमध्ये अनुवादित झाल्या आणि मराठीएवढेच अर्थवाही प्रयोग या भाषांमध्ये झाले.

बहुतेक विषय हे त्यांच्या चौफेर वाचनातून, जग बघण्यातून, मानवी स्वभावाचा ठाव घेण्याच्या वृत्तीतून यायचे. भरभरून जग बघितल्याने ब-यावाईटाच्या पल्याड असलेल्या जगाचे दर्शन घडवीत असते. त्यांचे हे दर्शन खूप समृद्ध असते, दिशादर्शक असते. प्रत्येकाला आपला मार्ग शोधायला प्रवृत्त करणारे आणि प्रेरणादायी असते.
प्रदीप राणे हे बाह्यार्थाने कधीच ठोकताळ्याने दिग्दर्शन करीत नसायचे. हा त्यांचा लौकिक नाटकाचा पट, पात्रांचे ताणेबाणे, वीण, ताणतणाव यांचा संहितेच्या आराधाने प्रत्येकाला शोध घ्यायला ते लावायचे. त्यांना नाट्य परिणामांची कधीच तमा नसायची; पण या मंथन प्रक्रियेत कलावंत सक्रिय झाल्यावर जे फलित मिळायचे ते अस्सल, बावनकशी असायचे. ते त्या-त्या कलावतीचे स्वत:चे असायचे. आभासापलीकडच्या सत्याचा शोध घेणारे असायचे.
श्री.ना. पेंडसेंच्या कादंबºयांचे अधिकार मी मिळविले. त्यावर प्रदीपला मालिकेच्या संहिता लिहिण्याचा आग्रह केला. थोडेफार कामही झाले; पण आमचे प्रयास फलदायी झाले नाहीत. प्रयोग मालाड या संस्थेने राणे यांच्या एकांकिका महोत्सवाचे भव्य आयोजन करून युवा पिढीला त्यांच्या एकांकिकांचा नजराना पेश केला आहे.
(लेखक हे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत.)

Web Title: Pradeep Rane, a fiancé of the drama of youth, has made a big difference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.