आता ‘स्वच्छ खाद्यपदार्थ अभियान’ राबविण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 04:02 AM2018-09-17T04:02:31+5:302018-09-17T04:03:15+5:30

यापुढे स्वच्छता अभियान राबवत असताना, स्वच्छ खाद्यपदार्थ अभियान राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

Now the need to implement 'Clean Food Campaign' | आता ‘स्वच्छ खाद्यपदार्थ अभियान’ राबविण्याची गरज

आता ‘स्वच्छ खाद्यपदार्थ अभियान’ राबविण्याची गरज

Next

- पंकज पाटील, अंबरनाथ />
देशभर राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत अभियानात’
अंबरनाथ पालिकेने सलग दोन वर्षे चमकदार कामगिरी केली. राष्ट्रीय पातळीवर झेंडे रोवले असले, तरी आजही नागरिकांचे आरोग्य धोक्यातच आहे. कारण हा धोका अस्वच्छ खाद्यपदार्थांच्या सेवनाचा आहे. यापुढे स्वच्छता अभियान राबवत असताना, स्वच्छ खाद्यपदार्थ अभियान राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
गेल्या १५ दिवसांत अंबरनाथ आणि बदलापुरात खाद्यपदार्थांत घातक आणि विषबाधा होईल, अशा किळसवाण्या घटना घडल्या आहेत. सर्वात अगोदर अंबरनाथच्या बबन वडापाव सेंटरमध्ये बटाटावड्यात मेलेली पाल आढळली. यानंतर हे सेंटर बंद करण्यात आले. प्रसिद्ध वडापाव सेंटरमध्ये पाल सापडल्याने येथील वडापाववर ताव मारणाऱ्यांना धक्का बसला. त्यानंतर अवघ्या १० दिवसांत बदलापुरातील वडापाव सेंटरमध्येदेखील पाल आढळली. या प्रकारामुळे पुन्हा एकदा वातावरण दूषित झाले. खाद्यपदार्थ तयार करणाºया प्रत्येक गाड्यांवर आणि दुकानांवर पालिकेमार्फत देखरेख करण्यात यावी, अशी मागणी केली गेली. हातगाडीवर स्वस्त दरात मिळत असलेला वडापाव ही सर्वसामान्यांची गरज आहे. शहरात प्रत्येक १०० मीटर अंतरावर वडापावची गाडी दिसते. वडापावसोबत शहरात पाणीपुरी, सँडविज, चायनिज भेल, चायनिज राइस आणि दाबेली यांच्या असंख्य गाड्या, छोटी दुकाने आहेत. त्या प्रत्येक दुकानावर ग्राहकांची गर्दी आहे. हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ हा गोरगरिबांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सरसकट कारवाई केल्यास लोकांची गैरसोय होईल. त्यामुळे गाड्यांवरील स्वच्छतेच्या परिस्थितीत कशी सुधारणा होईल, याचा विचार करण्याची वेळ पालिकेवर आली आहे.
अंबरनाथ आणि बदलापुरातील वडापावमधील पालीच्या घटनांबरोबरच एमआयडीसीमधील एका कंपनीत कामगारांना झालेली विषबाधा ही गंभीर घटना असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे लक्षण आहे.
अंबरनाथ असो वा बदलापूर पालिका, या दोन्ही पालिकांनी स्वच्छ भारत अभियानात प्रचंड मेहनत घेतली. अंबरनाथ पालिकेचा स्वच्छतेत देशात ६७ वा क्रमांक लागला. त्यामुळे पालिका स्वच्छतेच्या बाबतीत परिणामकारक काम करीत असल्याचे चित्र दिसले. मात्र, अन्नातून विषबाधेच्या या घटनांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तीव्र बनला. शहर स्वच्छतेसोबत नागरिकांना दिले जाणारे अशुद्ध पाणी आणि खाद्य पदार्थांमधील भेसळ हे प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. खाद्य पदार्थ विकणाºया हातगाड्या असो वा हॉटेल त्यांनी स्वच्छतेबाबत घेतलेल्या खबरदारीवर पालिकेची देखरेख असण्याची गरज आहे. हातगाडीवर खाद्यपदार्थ विकतांना किमान काय काळजी घ्यायला हवी, याचे संदेश देणे गरजेचे आहे. खाद्यपदार्थ अन्यत्र तयार करुन त्याची विक्री करण्यासाठी परवान्याची गरज असते. मात्र, हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणारे या नियमांचे पालन करीत नाहीत. अन्न आणि आष्ौध प्रशासनानेही त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.
अनेक ठिकाणी महिला बचत गटाच्या मार्फत पोळीभाजी केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यांची योग्य नोंदणी केली जात नसल्याने हा व्यवसाय अनधिकृत ठरविण्यात येत आहे.
अशा पोळीभाजी केंद्रांना परवाने घेताना नियम शिथील करून स्वच्छतेवर भर देण्याची सक्ती करणे गरजेचे आहे.
ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ तयार होतात, त्या ठिकाणी कसे वातावरण असावे, याचाही विचार करण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे.

Web Title: Now the need to implement 'Clean Food Campaign'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.