बाप्पांसाठी चक्क अर्धा किलोचा मोदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 23:55 IST2019-09-05T23:55:05+5:302019-09-05T23:55:14+5:30
सचिन काकडे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाल्याने सर्वत्र उत्साहाला उधाण आले आहे. लाडक्या ...

बाप्पांसाठी चक्क अर्धा किलोचा मोदक
सचिन काकडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाल्याने सर्वत्र उत्साहाला उधाण आले आहे. लाडक्या गणरायाला लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तूंनीही बाजारपेठ फुलली असून, प्रामुख्याने मोदकांना मागणी वाढू लागली आहे. बाजारपेठेत पंधरा ग्रॅमपासून ते अगदी अर्धा किलो वजनाचे २१ प्रकारचे मोदक विक्रीस दाखल झाले आहेत.
गणपती बाप्पाला प्रिय असल्याने गणेश पूजनात मोदकांना विशेष मान व स्थान असते. त्यामुळे यंदाही बाजारापेठेत मावा, आंबा, पिस्ता, गुलकंद, स्ट्रॉबेरी, संत्रा, मलई, काजू, मोतीचूर, ड्रायफूट, खजूर, डिंक, शेंगदाणा, उकडी, खजूर अशा विविध प्रकारात रुचकर मोदक विक्रीस उपलब्ध झाले आहेत. हे मोदक वैशिष्ट्यपूर्ण असल्याने मोदकांना मागणी वाढू लागली आहे. सध्या गुलकंद, पिस्ता, स्ट्रॉबेरी आणि आंबा या प्रकारातील मोदकांचीच बाजारपेठेत चलती असून, ४८० ते ८०० रुपये किलो या दराने विक्री होत आहे.
मोदकासह कडक बुंदीचे लाडू व बुंदी मोदकालाही भाविकांमधून मागणी होऊ लागली आहे. गणेशाला विविध प्रकारच्या फुलांचा हार घातला जातो. त्याच पद्धतीने यंदा प्रथमच मोदकांचा हारही उपलब्ध झाला आहे. मागणीनुसार मोदकांचे हार बनवून दिले जात आहेत. दररोज दीडशे ते दोनशे किलो मोदकांची विक्री होते.