Curious, shocked and jarring ending | कुतूहल, धडधड अन् चटका लावणारा शेवट
कुतूहल, धडधड अन् चटका लावणारा शेवट

जगदीश कोष्टी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : भारतीय आंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’ने पाठविलेले ‘चांद्रयान २’ शनिवारी पहाटे चंद्राच्या दक्षिण धु्रवावर उतरणार होते. याबाबत सोशल मीडिया तसेच प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी झाल्याने लहानांपासून मोठ्यांना प्रचंड कुतूहल होते. त्यातून सहकुटुंब मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत दूरचित्रवाहिनी संचासमोर बसून होते. शेवटच्या पंधरा मिनिटांत सातारकरांच्या मनात कुतूहल, हृदयात धकधक अन् शेवटी तोंडातून ‘अरे बाप रे...’ असे शब्द बाहेर पडले.
लहानपणी आजीबाईच्या गोष्टी, आईच्या अंगाईतून चंदामामा अनेकदा भेटला. त्यामुळे चंद्र आणि माणसांचे जवळचे नाते आहे. चंद्रावर सोडले जाणारे यान, ते कसे उतरते याविषयी प्रत्येकालाच उत्सुकता असते. भारतीय आंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने ‘चांद्रयान २’ ही मोहीम राबविली होती. या मोहिमेविषयी प्रसार माध्यमे तसेच सोशल मीडियातून भरभरून लिहून आले आहे. त्याचप्रमाणे शाळांमधूनही मुलांमधील वैज्ञानिक जाणिवा वाढीस लागाव्यात, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे या मोहिमेविषयी सर्वांनाच उत्सुकता होती.
हे यान मध्यरात्री दीड ते अडीचच्या सुमारास चंद्रावर उतरणार होते. त्यामुळे चिमुरड्यांनी तर दुपारीच एक झोप घेऊन रात्री जागण्याचे नियोजन केले होते. तीन ते चार तास ते दूरचित्रवाहिनीसमोर बसून होते. हे यान चंद्राच्या कक्षेत सुरक्षितपणे आले. तेव्हा ‘इस्त्रो’तील शास्त्रज्ञांनी टाळ्या वाजल्या. तेव्हा आपसूक घरातील मंडळींचे हातही टाळ्यांसाठी सज्ज झाले. अनेकांना काय चालले हे कळत नव्हते. शास्त्रीय आकडेमोड माहीत नाही. तरीही स्वत:च अनुमान लावत होते.
हे यान जसजसे चंद्राच्या जवळ येऊ लागले तसतशी सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढले. अन् ते एका ठिकाणी स्थिरावल्यानंतर शास्त्रज्ञांचे चेहरे पडले. ते पाहून जे समजायचे ते सर्वजण सजमले; पण असं व्हायला नको होतं, हे शब्द बाहेर पडले.
^इतर वेळी रात्रंभर क्रिकेट पाहून झोप मोड करणारी मुलं आंतराळ यानाची माहिती घेत होते. हे पाहून पालकांमधूनही कौतूक होत होते. त्यामुळे त्यांनीही मुलांसोबत बसून यानाची माहिती घेतली.

दुसऱ्या दिवशीही
याचीच चर्चा
रात्री उशिरापर्यंत जागले असले तरी अनेकांना रात्री झोप लागली नाही. यानाचा संपर्क पुन्हा होईल, अशी आशा त्यांना असल्याने सकाळी उठल्याबरोबर अनेकांनी इंटरनेटवर जाऊन काय झाले, हे जाणण्याचा प्रयत्न करत होते. शनिवारी शाळेत गेल्यानंतरही अनेकांच्या तोंडी या यानाचीच चर्चा होती. काहींनी सोशल मीडियातून भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. पण प्रत्येकजण या मोहिमेचा एक भाग होण्याचा प्रयत्न करत होता.


Web Title: Curious, shocked and jarring ending
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.