कुटुंबसंस्थेत संवाद थांबला, वाद वाढला, विवाहबाह्य संबंधांमुळे कौटुंबिक वातावरण बिघडलेले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 04:57 PM2018-02-25T16:57:49+5:302018-02-25T16:57:49+5:30

आज महिलावर्ग शिक्षणाबरोबरच सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने वावरत आहेत. त्यामुळे स्त्री - पुरुष समानता प्रस्थापित होऊ लागली आहे. शिक्षणाने महिलांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत.

Communication stopped in family, dispute grew, family atmosphere spoiled due to unmarried relations | कुटुंबसंस्थेत संवाद थांबला, वाद वाढला, विवाहबाह्य संबंधांमुळे कौटुंबिक वातावरण बिघडलेले

कुटुंबसंस्थेत संवाद थांबला, वाद वाढला, विवाहबाह्य संबंधांमुळे कौटुंबिक वातावरण बिघडलेले

- शोभना कांबळे
रत्नागिरी : आज महिलावर्ग शिक्षणाबरोबरच सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने वावरत आहेत. त्यामुळे स्त्री - पुरुष समानता प्रस्थापित होऊ लागली आहे. शिक्षणाने महिलांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत. मात्र, याची दुसरी बाजू म्हणजे अनेक समस्याही तिच्यासमोर उभ्या आहेत. याचा परिणाम स्त्री - पुरुष यांच्या वैवाहिक जीवनात संघर्ष होण्याचे प्रकार वाढले आहेत. येथील जिल्हा महिला सुरक्षा विशेष कक्षाकडे गेल्या तीन वर्षांत तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे संघर्ष प्रामुख्याने सोशल मीडिया, दोघांमधील अहंकार आणि माहेरचा नको तितका हस्तक्षेप या प्रमुख तीन कारणांमुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचबरोबर बाहेरचे संबंध, व्यसनाधीनता आदी कारणांमुळेही वैवाहिक संस्थेला सुरूंग लागतो की काय, अशी शंका निर्माण होत आहे. विशेष म्हणजे या कक्षाकडे आता पुरुषवर्गही न्यायासाठी येऊ लागला आहे.

जिल्हा महिला सुरक्षा विशेष कक्षात महिलांच्या तक्रारी, त्यांच्या समस्या यांचे निराकरण केले जाते. ही प्रक्रिया अतिशय गोपनीय असल्याने महिला अगदी निर्धास्तपणे या कक्षाकडे येऊ लागल्या आहेत. वैवाहिक जीवनातील समस्या सोडवताना त्या दाम्पत्याचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात न येता, समजुतीने त्यांचा संसार पुन्हा जुळवून देण्यासाठी हा कक्ष प्रयत्न करीत असतो. पूर्वीची चूल आणि मूल ही संकल्पना कधीच मागे पडली आहे. आज स्त्रीही उच्चशिक्षित होऊन पुरुषाच्या बरोबरीने अर्थार्जनासाठीही बाहेर पडू लागली आहे. तिच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ती आत्मनिर्भर, स्वावलंबी झाल्याने तिचे निर्णयही ती स्वतंत्रपणे घेऊ लागली आहे. मात्र, पुरुषी अहंकार तर काही वेळा सोशिक अशी प्रतिमा असलेल्या स्त्रीचाही पराकोटीचा अहंकार, त्यातच बदलत्या काळानुसार बदलती जीवनशैली आणि मुख्य म्हणजे सोशल मीडियाचा अतिरेकी वापर या तीन प्रमुख कारणांमुळे वैवाहिक जीवनात संघर्ष निर्माण होण्याचे प्रकार वाढल्याचे या कक्षाकडे आलेल्या तक्रारींवरून निदर्शनाला येऊ लागले आहे.

आधुनिक समाजात प्रेमविवाह होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच भर म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यांच्या माध्यमातून परिचय झाल्यानंतर अगदी अल्पकाळातच परिचय वाढून त्याचे रूपांतर प्रेम आणि त्यानंतर लग्नात होण्याचे प्रकार वाढते आहेत. मात्र, लग्नानंतर काही काळ गेल्यानंतर वैचारिक भिन्नता लक्षात येते. मात्र, काही वेळा दोघांचेही अहंकार तितकेच तीव्र असतात, त्यामुळे माघार घ्यायची कुणी, असा प्रश्न निर्माण होतो. दोघांनाही आपल्या चुकांबद्दलची जाणीव होत नसल्याने मीच का बदलायचं हा अहंकार आड येतो. त्यातूनही संघर्ष वाढत आहेत.

रत्नागिरीतील जिल्हा महिला सुरक्षा विशेष कक्षाकडे सध्या तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे. आतापर्यंत या कक्षाकडे केवळ महिलांच्या समस्या किंवा तक्रारी सोडवल्या जातात, असे समजले जात असे. आता स्त्री - पुरुष समानता जतन करतानाच काही वेळा पुरुषांनाही आपल्यावर अन्याय होत असल्याचे वाटते. त्यामुळे या कक्षाकडे पुरुषांच्याही तक्रारी येऊ लागल्या आहेत. एकंदरीत गेल्या तीन वर्षांचा आढावा घेता, विविध कारणांवरून वैवाहिक संबंधांत कलह निर्माण होत आहेत. त्यावर अहंकार बाजूला सोडून दोघांनी सांभाळून घेतले तरंच विवाहसंस्था दुभंगणार नाही.

पती - पत्नीमध्ये विश्वास असायला हवा
दाम्पत्यजीवन सुखी करायचे असेल, तर पती - पत्नीचे नाते घट्ट असायला हवं. त्यासाठी एकमेकांवर विश्वास असायला हवा. मनात संशय आला तर त्याचे कारण समजून द्यायला आणि घ्यायला हवे, दोघांमध्ये सुसंवाद हवा. चूक कबूल करण्याची मानसिकता हवी, एकमेकांना अपशब्द बोलणे टाळायला हवे आणि मुख्य म्हणजे एकमेकांच्या अपेक्षा समजून घेऊन त्याविषयी आदर बाळगायला हवा. यातूनही काही कठीण समस्या आली तर त्यावर दोघांनी एकत्र येऊन तोडगा काढायला हवा. आपल्यात असलेला वाद मिटावा, यासाठी दोघांकडूनही प्रामाणिक प्रयत्न हवेत. याउपरही काही वाद किंवा एकमेकांबद्दलच्या तक्रारी असतील तर त्यांनी निर्भयपणे महिला कक्षाकडे यावे. हा कक्ष त्यांचा संसार टिकवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल.
- स्वाती यादव,
जिल्हा महिला सुरक्षा विशेष कक्षप्रमुख

माहेरचा नको तेवढा हस्तक्षेप
ठरवून झालेला विवाह किंवा प्रेमविवाह असो. दोघांत वितुष्ट आले तर ते दूर करण्याऐवजी माहेरची मंडळीच त्यात नको तेवढा हस्तक्षेप करून तणाव वाढवतात. माहेरची श्रीमंती असेल तर पत्नी सदैव पतीची अवहेलना करत राहते. माहेरची मंडळी तिचा अहंकार वाढवण्यात अधिक भर घालतात. काहीवेळा तर प्रेमविवाह असेल तर मी माझ्या माहेरच्यांना सोडून आले, मग तूही तुझ्या आई-वडिलांना सोडून ये, आपण विभक्त राहू, अशी मागणीही वाढू लागल्याने विभक्त कुटुंब व्यवस्था वाढू लागली आहे.

विवाहबाह्य संबंधांमुळे संघर्ष
सध्या अनेक मालिकांमध्ये सर्रास विवाहबाह्य संबंध दाखवले जात आहेत. मात्र, सध्या समाजातही असे संबंध वादाला कारणीभूत ठरत आहेत. स्त्री - पुरूष व्यवसाय, नोकरीच्या ठिकाणी एकत्र काम करीत आहेत. यातून काहीवेळा असे संबंध निर्माण होत असल्याने काहीवेळा अगदी १५ - २० वर्षांचे वैवाहिक जीवनही संपुष्टात येते की काय, असा धोका निर्माण झाला आहे.

पती - पत्नीमधील अहंकार
पतीप्रमाणेच पत्नीही आता नोकरी - व्यवसायासाठी बाहेर पडत आहे. त्यामुळे एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. जास्त वेळ कार्यालयात असणे, कामाचा ताण यामुळे पतीने घरी आल्यानंतर मदत करावी, अशी पत्नीची अपेक्षा असते. मात्र, अजूनही पुरूषी अहंकाराला ते मान्य नसल्याने यातून संघर्ष वाढत आहेत, तर काहीवेळा अवाजवी स्त्री स्वातंत्र्याचा त्रास पतीला सहन करावा लागतो. एकमेकांना दूषणे दिली जातात. माघार घेण्यास दोघांपैकी कुणाचीच तयारी नसल्याने मग अगदी एक-दोन वर्षांतच दोघांमधील हा संघर्ष पराकोटीला जाण्याच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत.

सोशल मीडिया वादाला कारणीभूत
संसाराची घडी विस्कटण्याच्या कारणामध्ये असलेले प्रमुख कारण म्हणजे सोशल मीडिया. सध्याची पिढी तर अधिकाधिक वेळ व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर घालवत असलेली दिसते. बहुतांशी पती - पत्नीही रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर चॅटिंग करत बसतात. यामुळे वैवाहिक जीवनात संघर्ष निर्माण होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागली आहे. त्याचबरोबर स्त्री - पुरूष एकत्र काम करू लागले आहेत. एकमेकांवर विश्वास नसेल तर अपु-या, अर्धवट माहितीवर विश्वास ठेवला जातो आणि मग त्यातून निर्माण झालेल्या संशयावरून एकमेकांना त्रास देताना अगदी घटस्फोट घेण्याचा पराकोटीचा निर्णयही घेतला जातो.

विवाहापूर्वीचे संबंध
विवाहापूर्वी दुस-या कुणावर प्रेम असले तरी काही अडचणींमुळे त्याच्याशी लग्न होऊ शकत नाही. मात्र, लग्नानंतरही पूर्वीच्या मित्र - मैत्रिणींशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क वाढवला जातो. यातूनही वैवाहिक नातेसंबंध दुरावण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागली आहे.

इंटरनेटमुळे संवाद थांबला
विवाहसंस्था टिकवायची असेल तर पती - पत्नीमधील नात्यात एकमेकांबद्दल विश्वास असणे गरजेचे आहे. वाद झाला तर तो किती ताणायचा, हे दोघांनीही ठरवायला हवं. मुख्य म्हणजे संशयाला कारणीभूत ठरणाऱ्या सोशल मीडियाचा अतिरेकी वापर दोघांनीही टाळायला हवा. घरात आल्यानंतर एकमेकांना त्याचबरोबर घरातील मुलांना अधिकाधिक वेळ द्यायला हवा. सध्या घरातील संवाद मोबाईल, इंटरनेट यामुळे थांबल्याने नातीही दुभंगली जात आहेत.

Web Title: Communication stopped in family, dispute grew, family atmosphere spoiled due to unmarried relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.