'Intoxication' and degeneration | ‘नशाखोरी’ आणि अध:पतन

‘नशाखोरी’ आणि अध:पतन


सविता देव हरकरे
नागपूर
- मोठ्या भावाला असलेलं दारुचं व्यसन आणि त्याच्या या व्यसनापायी कुटुंबीयांना होणारा त्रास असह्य झाल्यानं सख्ख्या भावानं त्याला झोपेतच गळा दाबून संपवलं.
- मोठ्या भावानं दारुसाठी घरातील धान्य विकलं म्हणून रागाच्या भरात दोन लहान भावंडांनी त्याची दगडानं ठेचून हत्या केली.

या दोन्ही हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना आहेत दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील. पहिली वरोºयातील तर दुसरी ब्रह्मपुरीची. मरणाऱ्याचं वय अवघं २८ वर्ष.
व्यसनाधिनाला त्याच्या कुटुंबीयांनीच संपविल्याची ही काही पहिली घटना नाही. तीनचार वर्षांपूर्वीच नागपुरात एका तरुण मुलानं आपल्या दारुड्या पित्याची हत्या केली होती. तर जवळपास १५ वर्षांपूर्वी एका मातेनं आपल्या पोटच्या पोराला यमसदनी पाठवलं होतं. त्या घटनेनं सारं शहर त्यावेळी हादरुन गेलं होतं. आई आपल्या मुलाला मारु शकते ही कल्पनाच कुणाला पचत नव्हती. पण हे अघटित घडलं होतं.२४ तास दारुच्या नशेत राहणाऱ्या त्या मुलानं आपल्या आईची काळजी घ्यायची सोडून तिच्यावर भीषण अत्याचार सुरू केले होते. दारुसाठी पैसे दिले नाही की तिला मारहाण करणं, स्वत:ची लघवी पिण्यास भाग पाडणं एवढी अमानवीय वागणूक तो देत असे. शेवटी आईचा संयम सुटला. व्यसनाधिनांकडून होणाऱ्या हत्याही काही कमी नाहीत. असंख्य आहेत.
व्यसनाधिनतेनं या देशात दररोज किती हिंसाचार होतो किती गुन्हे घडतात, किती अपघात होतात याचा नेमका आकडा सांगणे कठीणच. पण तो निश्चितच फार मोठा आहे. हैदराबादेतील महिला पशुवैद्यकावरील बलात्कार व हत्येची घटना असो वा देशाच्या इतर भागात महिलांवर होणारे अत्याचार अशा बहुतांश प्रकरणात गुन्हेगार हे दारु प्यायलेलेच असल्याचं निदर्शनास आलंय. अशा अनेक घटना म्हणा अथवा गुन्ह्यांचं मूळ या दारुत दडलंय. पण आपण तिची साथ सोडायला तयार नाही. उलट दिवसेंदिवस अधिकाधिक संख्येत पुरुष आणि स्त्रियाही तिचे गुलाम बनत आहेत. असं करत असताना आपण स्वत:ला, स्वत:च्या कुटुंबाला आणि समाजाला विकास गंगेत नव्हे तर गटार गंगेत बुडवतोय याचं जराही भान या लोकांना नाही. त्याचं कारण असं की दारु पिणं वाईट असतं हेच त्यांना मान्यच नाही. यासंदर्भात गेल्या आठवड्यात जळगावच्या पाचोरा गावात घडलेल्या घटनेचा विचार करता येईल. या गावात दारुबंदी व्हावी म्हणून तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र गावातील दारुड्यांनी त्यात रोडा घातला म्हणतात. बैठकीत उलटसुलट प्रश्न विचारुन एवढा गोंधळ घातला की बैठक अर्धवटच गुंढाळावी लागली. राम लक्ष्मणाच्या बंधुप्रेमाचा आदर्श मानणाऱ्या या देशात सख्खा भाऊ भावाची हत्या करतो आणि लोक दारुबंदीसाठीची सभा उधळून लावतात याला काय म्हणावे? हे अध:पतनच नाही का?
महात्मा ज्योतिबा फुले यांनी १९ व्या शतकात लोकांना ‘दारु सोडा आणि ग्रंथ वाचा’ हा संदेश देण्यासाठी भरघोस लिखाण केलं. ‘थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा, तो पैसा भरा ग्रंथावरी’ असं ते म्हणत. महात्मा गांधींनी सुद्धा ब्रिटिशांच्या दारुगुत्त्यांना परवानगी देण्याच्या निर्णयाला विरोध करत, ‘आमची मुलं अडाणी राहिलीत तरी चालतील, पण त्यांना व्यसनी बनवू नका’ असं ठणकावलं होतं. आज आपल्या देशात ब्रिटिशांचं राज्य नसलं तरी दारु आणि त्यातून होणाºया उत्पन्नाचा मोह सरकारला दूर ठेवू शकला नाही,हे ही तेवढच खरं. सरकार मग ते कुठल्याही पक्षाचे असो दारुपासून मिळणाऱ्या उत्पादन शुल्कासाठी ते आसुसले असते. एखादा दारुडा आनंदात असो वा दु:खात दारुकडेच वळतो. अगदी तसच सरकारचं आहे. अगदी तसच सरकारचं आहे. ते सुद्धा शेवटी दारु उत्पादनाकडच वळतं. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे राज्यात नवे सरकार आरुढ झाल्यावर सर्वप्रथम मुद्दा उपस्थित झाला तो चंद्रपुरातील दारुबंदी उठविण्याचाच. त्यावरुन राजकीय नेत्यांमध्ये कसं वादंग माजलं होतं हे आम्ही सर्वांनी बघितलं. थोडक्यात दारुच्या उत्पन्नाची नशा करी समाजाची दुर्दशा असं म्हणायची वेळ आज आली आहे.
राज्यातील कुठल्याही व्यसनमुक्ती केंद्राचा फेरफटका मारा. तिथं तुम्हाला गांजा, चरस,एमडी या सगळ्या अमलीपदार्थांच्या तुलनेत दारुचे व्यसनाधिन जास्त दिसतील. हे व्यसनाधिन आणि त्यांचे कुटुंब आयुष्यातून अक्षरश: उठले आहेत. त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालय. कुठलंही व्यसन लागायला वेळ लागत नाही पण ते सोडणं एवढं सोपं नाही. अनेकदा वर्षोनवर्ष उपचार घेऊनही ते शक्य होत नाही. या कुटुंबांच्या व्यथा ऐकल्या की अंगावर काटा येतो. बहुतांश अमलीपदार्थ व्यसनाधिनांची सुरुवात ही मद्यापासूनच झालेली असते. त्यामुळं दारु ही आपल्या समाजासाठी सर्वाधिक घातक आहे.
दारु ही स्लो पॉयझनसारखी आहे. ती हळुहळु माणसाचं शरीर निकामी करते. ती घेणाऱ्यांनाही हे कळतं पण वळत नाही. आणि मग ते स्वत:सोबत कुटुंबाचाही सर्वनाश करतात. माणूस स्वत: याबाबत जागरुक होईल तेव्हाच हे थांबू शकेल. खºया अर्थानं दारुमुक्ती होईल.

Web Title: 'Intoxication' and degeneration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.