मास्कचा महिमा, फॅशनचा ट्रेंड आणि कोरोना......
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 15:34 IST2020-07-01T15:33:27+5:302020-07-01T15:34:11+5:30
मास्कचा महिमा सध्या साऱ्या जगभर सांगितला जातोय.

मास्कचा महिमा, फॅशनचा ट्रेंड आणि कोरोना......
सविता देव हरकरे
नागपूर
चेहऱ्यावर मास्क घालून वधुवर बोहल्यावर चढतील आणि लग्नात मास्क घातला नाही म्हणून नवदाम्पत्यास न्यायालय दंड ठोठावेल याची कल्पनाही आपण कधी केली होती काय? पण साऱ्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाने हे करुन दाखविले. अनेक लग्न पुढे ढकलली गेली आणि जी काही झाली त्यात नवरानवरी चेहऱ्याला मास्क लावून होमहवन करताना दिसले. आणि ज्यांनी मास्क घातला नाही त्यांच्यावर न्यायालयाने बडगा उगारला. पंजाब-हरियाणा हायकोर्टात हा गमतीशीर किस्सा घडला.
कोर्टात पंजाबच्या फााल्जिका जिल्ह्यातील एका प्रेमीयुगुलाच्या याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू होती. घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न करणारे हे दाम्पत्य न्यायालयाकडे सुरक्षेची विनंती करण्यासाठी आले होते. सुनावणी सुरू असतानाच न्यायमूर्र्तींचे लक्ष याचिकेवरील लग्नाच्या छायाचित्रावर गेले. लग्नाच्या वेळी वरवधूसह लग्नाला उपस्थित इतर मंडळींनी मास्क घातला नसल्याचे बघून ते नाराज झाले. मग त्यांनी या नवदाम्पत्यास ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. आणि या पैशातून मास्क खरेदी करुन जिल्ह्यातील लोकांना वाटप करण्यास सांगितले. तर अशा या मास्कचा महिमा सध्या साऱ्या जगभर सांगितला जातोय.
सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत, लहानांपासून ज्येष्ठांपर्यत मास्कमय झालेत. घरगुती रुमालापासून तर सर्जिकल मास्कपर्यंत अनेक प्रकारचे, आकाराचे हे मास्क कुणाला कंटाळवाणे होताहेत तर कुणी कोरोनाच्या भीतीनं घालतोय. काही लोक लावतच नाहीत आणि काहींनी त्याला कायम आपल्या हनुवटीवर स्थान दिलय. थोडक्यात सांगायचं झाल्यास बहुतांश लोक केवळ औपचारिकता म्हणून त्याचा वापर करताहेत. या मास्कनं तरुणाईची फारच गोची केली आहे. सतत स्वत:चा चेहरा हात फिरवून चाचपडणे मास्कमुळं शक्य होत नाही. तिकडे तरुणींनाही आपल्या मेकअपची स्ट्रॅटेजी बदलावी झाली असल्याचं कळतय. मास्कमुळे ओठ दिसत नसल्यानं त्यांनी डोळ्यांच्या मेकअपवर जास्त लक्ष केंद्रीत केलय. डोळे जास्त उठावदार कसे दिसतील याची काळजी त्या घेत आहेत. त्यामुळं बाजारातील लिपस्टीकची उचल मात्र कमी झाली आहे.
मास्कसह स्वत:चे सौंदर्य खुलविण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही महाभागांनी मात्र त्या फॅशन ट्रेंड करुन टाकलाय. यात मास्क तयार करणाऱ्यांच्याही कल्पकतेला सलाम करावा लागेल. सुरुवातीला एन-९५ मास्क, ३-डी मास्क सुरक्षित असल्याने ते खरेदीवर भर होता. पण आता असं दिसतय की सुरक्षेपेक्षा कुठला मास्क घातल्याने आपला चेहरा आकर्षक दिसले याला लोक जास्त महत्त्व देत आहेत. त्यामुळेच असंख्य प्रकारचे मास्क बाजारात आणि लोकाच्या चेहऱ्यावरही दृष्टीस पडत आहेत. आपल्या चेहऱ्याचे प्रिंट असलेले मास्क हा अफलातून प्रकार आहे. जो सध्या सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. भेटवस्तु म्हणूनही तो पसंतीला उतरला आहे. आपल्याच चेहऱ्याचे प्रिंट असलेला मास्क वापरणाऱ्यांनी एक चांगला युक्तीवाद मांडलाय. त्यांचं म्हणणं असं आहे की, एरवी मास्क घातल्याने चेहरा दिसत नाही. त्यामुळे माणूस ओळखायला येत नाही. अशात आपल्याच चेहऱ्यांचे प्रिंट असलेला मास्क घातला की समोरच्याची अडचण होत नाही. एकंदरीतच सध्या मास्कचा धंदा प्रचंड जोमात आहे.
आणखी एक गंमत म्हणजे घरी मास्क बनविणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही. लोकांचा हा उत्साह बघून काहींनी आॅनलाईन मास्क शिलाईचे क्लासेसही सुरू केलेत. रस्त्यावर , चौकाचौकात वेवेगळ्या कपड्याचे आकर्षक मास्क विकायला आलेत. शाळा कधी सुरु होणार याबाबत अनिश्चितता असली तर गणवेशासह विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर असलेला मास्क मॅचिंग हवा याचा केवळ विचारच नाहीतर तयारीही शाळा आणि त्यांना गणवेश पुरविणाऱ्या दुकानांनी सुरू केली आहे. म्हणजे पालकांना आता गणवेशासह मास्कचाही भुर्दंड सहन करावा लागणार.
मास्क हा कोरोनापासून बचावाचा सर्वमान्य उपाय मानला जात आहे. तसा तो आहेही. पण योग्य पद्धतीने वापरला तरच. मास्क कसा असायला हवा, तो कसा लावायचा, कसा काढायचा या सगळ्याचं विशिष्ट तंत्र आहे. आणि हे मास्क व्यवस्थितपणे लावले तर कोरोना विषाणुपासून बचाव होऊ शकतो. मास्क वापराचे अनेक नियम आहेत. पण बहुतांश लोकांकडून त्या नियमांचे पालन तर सोडा पण जे मास्क ते वापरताहेत त्याने विषाणुला रोखण्यात खरच किती यश मिळतय याबद्दल शंका आहे. मास्कप्रमाणेच फेसशिल्डची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम असा झाला की एरवी हेल्मेट बनविणाऱ्या कारखान्यांनी आता फेसशिल्डच्या निर्मितीवर भर दिला आहे. शाळांमध्ये मुलं आणि शिक्षकांना स्वस्त किमतीत फेसशिल्ड उपलब्ध करुन देण्याची तयारी त्यांनी चालवली आहे.
कोरोनामुळे भविष्यात अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. इतरांचे माहिती नाही पण मास्क आणि फेसशिल्ड बनविणाऱ्यांची तरी चांदी झाली आहे. त्यामुळंच कोरोना काळात अनेकांनी आपला धंदा बदलला आहे. एवढं सगळं करुनही या मास्कचा कोरोनापासून बचावाकरिता नेमका किती उपयोग होतो याबद्दल अजूनही सभ्रम कायम आहे. कुणी म्हणतात २ टक्के, कुणी म्हणतात ५ टक्के तर काहींच्या मते काहीच नाही. या मास्क पुराणात संसर्ग होऊ नये हा हेतू मागे पडत चाललाय की काय याची भीती वाटतेय.