श्वासाशी नातं... जो आयुष्यभर आपल्याला साथ देतो!
By गौरी ब्रह्मे | Updated: March 1, 2018 09:54 IST2018-03-01T08:10:21+5:302018-03-01T09:54:42+5:30
जन्म घेतल्यापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जर का आपलं कोणाशी घट्ट नातं असेल तर ते फक्त श्वासाशी असावं

श्वासाशी नातं... जो आयुष्यभर आपल्याला साथ देतो!
"जिंदगी ना मिलेगी दोबारा" मधला, पाण्याची आणि स्कूबा डायव्हिंगची प्रचंड भीती असलेला हृतिक आठवतो? अखेर डायव्हिंग करून येतो तेव्हा "तुला हे कसं जमलं"असं जेव्हा त्याला विचारलं जातं, तेव्हा तो काहीतरी भयंकर सिक्रेट सांगितल्यासारखा चेहरा करून हळूच सांगतो,"बस, साँस लेते रहो"! वरवर पाहता अगदी साधं वाटणारं वाक्य आहे, पण त्यामागे बराच गहन अर्थ आहे.
जन्म घेतल्यापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जर का आपलं कोणाशी घट्ट नातं असेल तर ते फक्त श्वासाशी असावं. हा श्वास कधी अडकतो, कधी रोखून धरला जातो, कधी मंद होतो, कधी दीर्घ घेतला जातो, कधी कोंडतो, कधी थांबतो, कधी एकमेकांत गुंफला जातो तर कधी सुटकेचा म्हणून सोडला जातो. सगळ्यात विदारक म्हणजे, हा जेव्हा स्वतःहून थांबवला जातो किंवा थांबवायला सांगितला जातो. हा श्वास जेव्हा आपली साथ सोडतो तेव्हा आपला शेवट निश्चित!
मला आठवतंय, मी पहिल्या बाळंतपणाच्या वेळी, सगळ्या पहीलटकरणींप्रमाणे, कळा येऊ लागल्या तशी प्रचंड घाबरले होते. काय करावं सुचत नव्हतं. दर तीन मिनिटांनी कळ यायची, तसा मला घाम फुटायचा, जीव घाबरा व्हायचा. या परिस्थितीत फक्त वाट बघणे हा एकच पर्याय आपल्याकडे असतो. एक नर्स तेव्हा माझ्या खोलीत काहीतरी घ्यायला आली होती. तिने माझी अवस्था पाहून जाता-जाता अगदी सहज माझ्या कानापाशी येऊन सांगितलं, "ताई, लांब श्वास घ्या, बघा फरक पडेल". किती सोपी गोष्ट होती खरं तर. पण त्यावेळी लक्षात नव्हती आली. मी प्रयत्न केला आणि खूप फरक जाणवला. ती लाख मोलाची गोष्ट सांगितलेली नर्स नंतर मला परत दिसली नाही. "त्याचं" कुठूनतरी आपल्यावर लक्ष असतं हे खरं!
जिममध्ये माझी एक मैत्रीण जीव खाऊन व्यायाम करते. नुसती जीव खाऊनच नव्हे, तर अगदी दातओठ खाऊन, तोंड घट्ट बंद करून! लवकर लवकर बारीक व्हायचं असतं ना, त्याला कष्ट पाहिजेतच. पण या गडबडीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विसरते, ती म्हणजे श्वास आत बाहेर करायची. नुसतेच शारीरिक व्यायाम उपयोगाचे नाहीत, त्याला श्वासाची साथ हवी, तरच हवा तो परिणाम मिळतो.
आपल्या शरीराला ऑक्सिजन कमी पडला, की तो प्रतिकार करायला लागतो. हा प्रतिकार मग हातपाय गळणे, भीती वाटणे, एखादा आजार होणे, जीव नकोसा होणे, अनेक व्याधी जडवून घेणे अशा गोष्टींमधून दिसायला लागतो. खरं तर, यातल्या अनेक गोष्टींवर जालीम उपाय हाच असतो, की श्वास पुरेसा आणि लयीत घेणे. आजकाल मोठमोठ्या आंतराष्ट्रीय सेमिनार्समध्ये या श्वासाशी कशी मैत्री करावी यावर सांगितले जाते, याचे टेक्निक्स शिकवले जातात. आपल्या भारतीय संस्कृतीत तर करोडो वर्षांपूर्वी या श्वासाच्या महतीवर संशोधन होऊन, योगद्वारे ते संपूर्ण जगासमोर आणले गेले आहे.
काही वर्षांपूर्वी माझ्या एका जर्मन मैत्रिणीने आणि मी एकत्र एक योगचा कोर्स केला होता. त्यातली पहिली शिकवण होती "ब्रीद". श्वास घेत राहा. बाकीचं सगळं आपोआप होईल. ही माझी मैत्रीण मला अधूनमधून तिचे अनुभव सांगत असते, मला अमुक प्रॉब्लेम आला, मग मी "डीप ब्रीदिंग" केलं आणि बरं वाटलं वगैरे. अशा वेळी मला तिला सांगावंस वाटतं, की बाई, त्यामानाने आम्ही भारतीय लोक फारच नशीबवान. आम्हाला डीप ब्रीदिंग करायचे चान्सेस भरपूर!!
बस वेळेत आली नाही....करा डीप ब्रीदिंग!
कामवाली बाई आली नाही....करा डीप ब्रीदिंग!
आज परत ट्राफिक जॅम...करा...
विनोदाचा भाग जाऊ द्या.
सत्य हे आहे जी गोष्ट आपल्याकडे जन्मापासून आहे तिलाच मुळी आपण एकतर प्रचंड गृहित तरी धरतो नाहीतर खिजगणतीतही धरत नाही. या श्वासाशी खरंतर घट्ट मैत्री करायला हवी, मग तो जन्मभर आपली भक्कम साथ देतो. काय म्हणता?!
gaurirbrahme@gmail.com