राज्यातील सर्वाधिक पाऊस काळम्मावाडीजवळ वाकी येथे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:44 IST2019-09-10T00:43:46+5:302019-09-10T00:44:05+5:30
चंद्रकांत कित्तुरे। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्टÑात सर्वाधिक पावसाचे ठिकाण बनण्याचा मान राधानगरी तालुक्यातील वाकी या गावाने मिळविला ...

राज्यातील सर्वाधिक पाऊस काळम्मावाडीजवळ वाकी येथे
चंद्रकांत कित्तुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्टÑात सर्वाधिक पावसाचे ठिकाण बनण्याचा मान राधानगरी तालुक्यातील वाकी या गावाने मिळविला आहे. एक जूनपासून आतापर्यंत तेथे १०,९२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे ८,५७५ मिलिमीटर, तर सातारा जिल्ह्यातील जोर येथे ८,१८१ मिलिमीटर आणि पाथरपुंज येथे ८,१३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी हा सुमारे ३५० किलोमीटरचा भाग सह्याद्री पर्वतरांगांचा आहे. या पर्वतरांगांमध्ये यंदा अभूतपूर्व पाऊस झाल्याने पावसाच्या नोंदींचे तीनही जिल्ह्यांत नवनवे विक्रम झाले आहेत. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे जून आणि जुलै महिन्याच्या २८ तारखेपर्यंत पावसाने काहीशी ओढ दिली होती. त्यामुळे हा पाऊस वर्षाची सरासरी तरी गाठतो की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, ‘अल निनो’चा प्रभाव हटला आणि २८ जुलैपासून दक्षिण महाराष्टÑात जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत ६ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट या काळात अभूतपूर्व असा महापूर आला. या काळात २००५ च्या तुलनेत तिप्पट पाऊस झाला.
तसेच गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अल्प कालावधीत उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जोर येथे ८१८१, पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे ८१३३ , महाबळेश्वर तालुक्यातील वालवण येथे ७३७२, नवजा येथे ७६४४ ,महाबळेश्वर ६६५४, प्रतापगड येथे ६२१३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यातील पाथरपुंज येथील पाऊस हा ४ सप्टेंबरपर्यंतचा आहे. त्यानंतरच्या नोंदी उपलब्ध नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पाथरपुंज येथीलच असू शकतो.
जलविज्ञान प्रकल्पाअंतर्गत राज्यात बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापकाद्वारे दर पंधरा मिनिटाला पडणाऱ्या पावसाची नोंद पुण्यातील नियंत्रण कक्षात होते. या नोंदीनुसार पावसाचे हे आकडे आहेत.
वाकी देशात तिसरे
देशातील सर्वाधिक पावसाची नोंद मेघालयातील मॉसिनराम येथील आहे. तेथे वर्षाला सरासरी ११,८७१ मिलिमीटर पाऊस पडतो. त्याखालोखाल चेरापुंजी येथे ११,७७७ मिलिमीटर पाऊस पडतो. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी (दूधगंगा) धरणाजवळ चापोडी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया वाकी गावात १ जून ते ८ सप्टेंबरअखेर १०,८०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अद्याप सप्टेंबर महिन्यातील तीन आठवडे पावसाळ्याचे आहेत. पाऊस चालूच राहिला, तर वाकी हे देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण बनू शकेल.
गगनबावड्यात ७०११ मिमी पाऊस
राधानगरी तालुक्यात वाकीनंतर सावर्डे येथे ६६२६, दाजीपूर येथे ६०६५ आणि दूधगंगानगर येथे ४९९६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा येथे ७०२०, रेवाचीवाडी येथे ६८३२, तर मांडुकली येथे ५६०४ मिलिमीटर, शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरणाच्या ठिकाणी ४९३२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.