बहुगुणी आवळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:19 IST2018-02-19T00:18:49+5:302018-02-19T00:19:34+5:30
जानेवारी, फेब्रुवारी महिने म्हणजे आवळ्यांचा मोसम. आवळ्यांचे झाड आकाराने लहान व साधारणपणे २० ते ३० फूट उंचीचे असते. आवळ्याचे शास्त्रीय नाव फायललँथस एम्ब्लिका असून फायलँथॅसी हे त्याचे कूळ आहे

बहुगुणी आवळा
निसर्ग कट्टा - डॉ. शीतल पाचपांडे
जानेवारी, फेब्रुवारी महिने म्हणजे आवळ्यांचा मोसम. आवळ्यांचे झाड आकाराने लहान व साधारणपणे २० ते ३० फूट उंचीचे असते. आवळ्याचे शास्त्रीय नाव फायललँथस एम्ब्लिका असून फायलँथॅसी हे त्याचे कूळ आहे. फायलँथस हे नाव एका ग्रीक शब्दावरून पडले असून त्याचा अर्थ पानावर असलेली फुले, असा होतो.
आवळ्याची फुले हिरवट पिवळी किंवा गुलाबी रंगाची आणि आकाराने लहान असतात. नर आणि मादी फुलांची रचना एकाच फांदीवर वेगवेगळ्या जागी आढळते. काही दिवसांतच मादी फुलांचे रूपांतर गोल, फिक्कट हिरव्या आवळा फळात झालेले दिसून येते. चवीने आंबट, तुरट असलेला आवळा स्वयंपाकघरात निरनिराळ्या रूपात हजेरी लावतो. मोरावळा, पेठा, सुपारी, लोणचे, सरबत इ. प्रवासातला महत्त्वाचा सोबती. आवळा सुपारी व पेठा सर्वांनाच परिचित आहे. आयुर्वेदात याचे अनेक उपयोग सांगितले आहेत. उदा. पित्तशामक, केशवर्धक,
शक्तिवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबेटिस, कॅन्सरसाठीही
आवळ्याचे सेवन केले जाते. असे बहुगुणी आवळ्याचे झाड शक्य असेल त्याने लागवड करून जरूर वाढवावे. sheetalpachpande@gmail.com