डॉल्फिन मृत होण्यामागील कारणे शोधण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 05:51 AM2018-07-22T05:51:27+5:302018-07-22T05:52:01+5:30

गेल्या काही वर्षांपासून डॉल्फिन्स मृत होऊन किनाऱ्यावर येणे किंवा मरणासन्न अवस्थेत किनाºयाकडे येण्याचे प्रमाण वाढत चाललेले आपण पाहत आहोत.

The need to find out the reasons behind the death of dolphins | डॉल्फिन मृत होण्यामागील कारणे शोधण्याची गरज

डॉल्फिन मृत होण्यामागील कारणे शोधण्याची गरज

Next

- डॉ. स्वप्नजा आशिष मोहिते

डॉल्फिन हा सिटेसियन कुळात मोडणारा सागरी सस्तन प्राणी आहे. व्हेल आणि पॉरपोईस हेसुद्धा या कुळात येतात. ४ फूट लांबीच्या माउई डॉल्फिनपासून ३० फूट लांबीच्या किलर व्हेलपर्यंतचे डॉल्फिन जगभरच्या समुद्रात राहत आहेत. आज डॉल्फिन्सच्या ४० प्रजाती आढळतात. समशीतोष्ण आणि उष्ण कटिबंधीय सागरी प्रदेश म्हणजे अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी महासागर या सागरांमध्ये यांचा संचार सुरू असतो. अतिशय बुद्धिमान आणि समूहप्रिय असे हे प्राणी अतिशय चपळपणे ४० किमी प्रति तास या वेगाने पोहू शकतात. हे सस्तन प्राणी फुप्फुसांद्वारे श्वासोच्छ्वास करतात. म्हणूनच त्यांना श्वास घेण्यासाठी व सोडण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर यावे लागते. अतिशय कमी तापमान असलेल्या खोल समुद्रात राहण्यासाठी डॉल्फिन्सच्या शरीरात काही महत्त्वाचे बदल घडले आहेत. त्यात त्यांच्या त्वचेखाली असणारा जाड ब्लबर म्हणजे चरबीचा थर याचा उल्लेख करावा लागेल. जवळपास १ फूट उंचीच्या या थरामुळे शरीरावर एक इन्सुलेटिंग आवरणच तयार होते. हा थर त्यांना थंड तापमानापासून बचाव करण्यासाठी तसेच पाण्यात तरंगण्यासाठी मदत करतो.
गेल्या काही वर्षांपासून डॉल्फिन्स मृत होऊन किनाऱ्यावर येणे किंवा मरणासन्न अवस्थेत किनाºयाकडे येण्याचे प्रमाण वाढत चाललेले आपण पाहत आहोत. किंबहुना सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे या गोष्टी आपल्यापर्यंत लगेच येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्राच्या किनाºयांवर प्रामुख्याने रत्नागिरी, रायगड, मुंबई येथे या घटना घडताना दिसून आले आहे. यासाठी काही कारणांचा वेध घेणे जरुरीचे ठरेल.
डॉल्फिन किनाºयाकडे कधी येऊ शकतात? किनाºयावर ते मृत अवस्थेत का आढळतात?
१) ते जेव्हा बांगडा किंवा तारली, माकूळ यांचा पाठलाग करत असतील तर ते किनाºयाकडे येऊ शकतात. असा पाठलाग करत असताना ओहोटी सुरू झाली तर ते किनाºयावरील वाळूत अडकून पडू शकतात. त्यांच्या महाकाय शरीराचा भार ते पाण्यात असताना सहज पेलू शकतात. पण पाण्याबाहेर त्यांच्या वजनामुळेच त्यांची इंद्रिये दबली जातात. त्यांची त्वचा सुकू लागली की त्याखालील चरबीच्या थरामुळे शरीरात खूप उष्णता निर्माण होते आणि ओव्हरहीटिंगमुळे डिहायड्रेशन होऊन ते मृत होतात.
२) काही वेळेस खोल समुद्रात पोहताना कार्गो बोट किंवा प्रवासी बोट अथवा तेथे मासेमारी करणाºया बोटीचा प्रॉप्लरचा पंखा लागून इजा झाल्यास आसरा घेण्यासाठी हे जलचर किनाºयाजवळ येतात. भरती-ओहोटीच्या प्रवाहात अडकून परत समुद्राकडे परतण्याची शक्ती न राहिल्याने ते किनाºयावर मृत होतात.
३) समुद्रात तेल शोधण्यासाठी किंवा मासे शोधण्यासाठी वापरल्या जाणाºया सोनार किंवा इकोसाउंडर यंत्रणेच्या वापराने अथवा बोटीच्या इंजिनांच्या आवाजाने डॉल्फिन्सच्या इकोलोकेशन प्रणालीत अडथळा येतो आणि ते कळपापासून भरकटतात.
ध्वनीची वारंवारिता आणि गती यांचाही या जलचरांच्या मेंदूवर परिणाम होतो. पाण्यात ध्वनीचा वेग १५०० मी. प्रति सेकंद असतो. सोनार सिग्नल्सची वारंवारिता ५ ते २०० किलो हटर््झ असते. डॉल्फिन्स एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या वारंवारितेचा उपयोग करतात. त्यांची क्षमता १५० किलो हटर््झच्या वरची असते. त्यामुळे त्या वारंवारितेचे इतर ध्वनी त्यांच्या ऐकण्याच्या प्रणालीत अडथळे आणतात. यामुळे ते आपल्या मार्गापासून भरकटू लागतात. १२० डीबी तीव्रतेचा ध्वनी त्यांना अस्वथ करतो, १७० डीबी ध्वनीमुळे अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो आणि २२० डीबी तीव्रतेच्या ध्वनीमुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. आपल्याकडे अजूनही पाण्याखालील ध्वनिप्रदूषणाबद्दल ठोस नियम नाहीत.
४) समुद्रात तरंगत असणाºया प्लॅस्टिक पिशव्या व इतर कचरा खाद्य समजून डॉल्फिन्स खातात. यामुळे श्वसनाला अडथळा येऊन, श्वास गुदमरून ते मरतात.
५) समुद्रात सोडलेल्या तेलाचा थर (आॅइल स्पिल्स) त्यांच्या त्वचेवर आणि ब्लो होलवर जमा झाला तरी हे डॉल्फिन्स श्वास न घेता आल्याने मृत्युमुखी पडतात.
६) मासेमारी बोटींनी समुद्रात टाकून दिलेली जाळी (ज्याला घोस्ट फिशिंग म्हटले जाते) हा एक मोठा समस्येचा विषय आहे. अशी जाळी समुद्रात खडक किंवा प्रवाळ यांना अडकून राहतात. त्यात अडकूनही डॉल्फिन्स श्वास घेण्यास वेळेत येऊ न शकल्याने मृत होतात.
७) हवामानातील बदल हाही हे जलचर किनाºयाजवळ येऊन अडकून पडण्यास कारणीभूत होऊ शकतो. समुद्र पृष्ठभागाचे वाढते तापमान डॉल्फिन्सना किनाºयाजवळ येण्यास भाग पाडते. किनाºयाजवळ येऊन तेथे बोटींना धडकूनही काही डॉल्फिन्स मरण पावतात.
समुद्रात वेगवेगळ्या कारणांनी मृत झालेले डॉल्फिन्स लाटांवर तरंगत किनाºयापाशी येऊ शकतात. अशा मृत डॉल्फिन्सची शरीरे कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे किनाºयावर आलेली त्यांची कलेवरे पूर्णपणे कुजलेली असतील तर हे डॉल्फिन्स नक्की कशामुळे मेले याची कारणे शोधणे अवघड बनते. डॉल्फिन्स जर किनाºयानजीक असताना जाळ्यात अडकणे किंवा बोटींचा पंखा लागून जखमा झाल्याने मृत झाले असतील तर त्याच्या खुणा शरीरावर दिसतात व त्यामागील कारणे शोधता येतात. तसेच या जलचरांच्या शरीरावर वंगण किंवा तेलाचा थर असेल तर तेही त्यांच्या मृत्यूचे कारण असू शकते.
समुद्रातील प्रदूषण ही एक वाढती समस्या आहेच. मुंबईमधील सांडपाणी काही अंशी त्यावर प्रक्रिया करून जरी समुद्रात सोडले गेले तरी त्यातील प्रदूषित घटकांचा परिणाम समुद्रावर होत असतोच. हे सांडपाणी भांडुप, घाटकोपर, ठाणे, कुलाबा, वर्सोवा, मालाड, वांद्रे आणि धारावी येथे सोडले जाते. पर्यायाने येथील खाड्यांचे पाणी अरबी समुद्र्रात मिसळते. यातच प्लॅस्टिकच्या कचºयाचीही भर पडत असतेच. समुद्रातील अन्नसाखळ्या या प्रदूषित घटकांचे जैविक संचय आणि जैविक आवर्धन करत जातात. डॉल्फिन्स हे या अन्नसाखळीतील सर्वात वरच्या पायरीवरील भक्षक असल्याने त्यांच्यामध्ये या प्रदूषित घटकांचे प्रमाण सर्वाधिक होते. याचा विपरीत परिणाम त्यांच्या इंद्रियांवर आणि रोगप्रतिकार प्रणालीवर होतो. सागरी पर्यावरणातील बदल अशा वेळी २३१ी२२ङ्म१२ चे काम करतात आणि हे जलचर रोगांना बळी पडू शकतात. या सगळ्याच गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन हे सस्तन प्राणी मृत होतात.
या सगळ्याच घटनांचा खोलवर अभ्यास करताना जगात इतरत्र घडणाºया अशा असंख्य घटना समोर आल्या. त्या त्या वेळेला तुरळक वाटल्या तरी पॅसिफिक सागरापासून अटलांटिक सागर ते हिंदी महासागर असा हा डॉल्फिनच्या मृत होऊन किनाºयावर येण्याच्या घटनांचा आवाका आहे. काही ठिकाणी २-५ डॉल्फिन्स तर काही ठिकाणी १०० हून अधिक डॉल्फिन्स मृत झाल्याच्या नोंदी घेतल्या गेल्या आहेत. १९८८-१९९० मध्ये नेदरलँड्स, इंग्लंड आणि जर्मनी येथे प्रथम अशी डॉल्फिन्स मृत होण्याची नोंद घेतली गेली आणि तेव्हापासून आयर्लंड, फ्रान्स, स्पेन, इटली, कॅनडा आणि अमेरिकेचे पूर्व किनारे, फ्लोरिडा, मेक्सिको, पेरू, ब्राझीलचा पूर्व किनारा, दक्षिण आफ्रिका, दुबई, आॅस्ट्रेलिया, तास्मानिया, न्यूझीलंड, तैवान, जपान आणि भारताचा पश्चिम किनारा असा हा मृत डॉल्फिन्स सापडणारा पट्टा लक्षात येतो. याची नोंद त्या त्या देशानेही घेतली आहे आणि यामागील कारणांचा अभ्यास या देशांमध्ये केला जात आहे. या संशोधनातून असे दिसून आले आहे की हे डॉल्फिन्स सिटेसियन मॉर्बिलीव्हायरस या विषाणूला बळी पडलेले आहेत.
अजूनही या सिटेसियन कुळातील या जलचरांना हा विषाणू संसर्ग
का आणि कसा होतो याची नीट माहिती संशोधकांना नाही, पण त्याचा अभ्यास केला जात आहे. असे
रोगग्रस्त डॉल्फिन्स समुद्रातील रासायनिक, भौतिक आणि ध्वनिप्रदूषण आणि इतर असंख्य घडामोडींना तोंड देत असताना मृत्युमुखी पडत असतील तर नवल नाही. याचा योग्य अभ्यास मात्र होण्याची नितांत आवश्यकता आहे.
(लेखिका रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत.)
 

Web Title: The need to find out the reasons behind the death of dolphins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.