कलावंताचा मानधनाचा प्रश्न मार्गी लावावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:38 IST2019-01-19T21:36:41+5:302019-01-19T21:38:29+5:30
अतुल जोशी धुळे - कलावंत आपल्या कलेतून, भजनातून जनप्रबोधनाचे काम मोठ्या प्रमाणावर करीत असतात. वृद्ध कलावंताची म्हातारपणी परवड होऊ ...

कलावंताचा मानधनाचा प्रश्न मार्गी लावावा
अतुल जोशी
धुळे- कलावंत आपल्या कलेतून, भजनातून जनप्रबोधनाचे काम मोठ्या प्रमाणावर करीत असतात. वृद्ध कलावंताची म्हातारपणी परवड होऊ नये या उद्दात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाने त्यांच्यासाठी मानधन योजना सुरू केलेली आहे. शासनातर्फे त्यांना दिले जाणारे मानधन आजच्या वाढत्या महागाईच्या काळात खूपच कमी आहे. मात्र ते अल्पसे मानधन दरमहा नियमित मिळावे यासाठीही या कलावंताना आजही ठिय्या आंदोलन करावे लागते ही शोकांतिकाच आहे. या कलावंताच्या मानधनाचा प्रश्न जिल्हा परिषदेने तत्काळ मार्गी लावून त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.
समाजप्रबोधन अथवा शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यात या कलावंताचाही सिंहाचा वाटा आहे. ्नराज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे वृद्ध कलावंताना दरमहा मानधन देण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील ५८३ कलावंतानी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर केले होते. यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी गठीत केलेल्या समितीने कलावंताची मुलाखत घेतली. जिल्ह्यातील ५८३ कलावंतामधून ६० जणांची मानधनासाठी सप्टेंबरमध्ये निवड करण्यात आली. निवड झालेल्या कलावंताना १५०० रूपये मानधन दिले जाणार आहे. मात्र ही निवड होऊन चार महिने झाले तरी या वृद्ध कलावंताच्या खात्यावर जानेवारी महिन्यांपर्यंत एक रूपयाही जमा झालेला नाही. मानधन मिळावे म्हणून हे कलावंत समाज कल्याण विभागाकडे मागणी करीत आहेत. मात्र तेथील अधिकारीही दाद देत नाही. अल्पशा मानधनासाठी या कलावंताना मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनासमोरच दुसºयांदा धरणे आंदोलन करावे लागले ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. जिल्हा परिषदेने या कलावंताच्या मानधनात वाढ करून तसेच त्यांना नियमित मानधन देवून दिलासा देणे अपेक्षित आहे.
केवळ मानधनच नाही तर स्वच्छतेचा जागर या कार्यक्रमातूनही स्थानिक कलावंताना डावलण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आणि महाराष्टÑ राज्य वारकरी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेच्या जाणिव जागृतीसाठी जिल्ह्यात २६ जानेवारीपासून स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे. ४० प्रवचनकार ६७२ महसुली गावांमध्ये प्रवचन करणार आहेत. मात्र या प्रवचन कार्यक्रमातून स्थानिक कलावंतांना डावलण्यात आले आहे. हा एकप्रकारे कलावंतावर अन्यायच असल्याचे खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाचे म्हणणे आहे. या मंडळातर्फे शासनाच्या लोककल्याणकारी योजना ग्रामपातळीवर पोहचविण्याचे कार्य गेल्या २-३ वर्षांपासून सुरू आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात ग्रामपंचायत पातळीवर शाश्वत स्वच्छतेविषयी ग्राम स्वच्छता अभियान हा कार्यक्रम राबविण्याची स्थानिक प्रवचनकार, कीर्तनकार, गायनचार्य यांनाही संधी मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे.