निवडणुकपूर्व हवे पोलिसांचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:20 IST2019-03-05T22:18:55+5:302019-03-05T22:20:04+5:30
धुळे : आत्तापासूनच लक्ष देण्याची गरज

निवडणुकपूर्व हवे पोलिसांचे नियोजन
- देवेंद्र पाठक
महापालिका निवडणुकीत धुळे पोलिसांची कसब पणाला लागल्यानंतर आता होऊ घातलेल्या लोकसभा आणि नंतर होणाºया विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्हा पोलिसांनी स्वतंत्रपणे आत्तापासूनच नियोजन करण्याची आवश्यकता आहे़ त्यादृष्टीने पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पावले उचलले असतील, अशी दाट शक्यता आहे़
निवडणूक असो वा कोणतेही सण आणि उत्सव या काळात पोलिसांचे नियोजन असते़ हे वेगळे सांगण्याची गरज नाही़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी धुळे दौºयावर येऊन गेले़ झेड प्लस सुरक्षा त्यांना असल्यामुळे प्रोटोकॉलनुसार पोलीस अधीक्षकांनी चोखपणे सुरक्षा व्यवस्था केली होती़ मात्र, दौºयाच्या शेवटपर्यंत किती अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी लावले आहेत? याची स्पष्ट आकडेवारी प्रसारमाध्यमांना मिळू शकली नाही, याचे दुर्देव आहे़ नियोजन असूनही त्याची आकडेवारी वेळेत उपलब्ध होऊ शकत नसेल तर खरोखरच नियोजन केले जाते का, नियोजन केवळ कागदोपत्रीच असते का, हा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ कोणत्याही बंदोबस्ताचे नियोजन घटनेच्या एक दिवस अगोदर पूर्ण करुन संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी रवाना करणे, मार्गदर्शक सूचना देणे ही देखील तितकीच महत्वाची जबाबदारी आहे, हे विसरता कामा नये़ असे असूनही शेवटपर्यंत केवळ नियोजनच सुरु असेल तर ही बाब योग्य आहे का? याचे आत्मपरिक्षण झाले पाहीजे़ मात्र, तेच होत नसल्याची वस्तुस्थिती आहे़ याकडे आता पोलीस अधीक्षकांनी पाहणे गरजेचे आहे़ प्रत्येक लहान-सहान बाबतीत पोलीस अधीक्षक यांना सहभाग घ्यावा लागत असेल तर नियोजनाचे नियोजन होणे क्रमप्राप्त ठरेल़
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोघांसह विद्यमान आणि माजी मंत्री धुळ्यात येऊन गेले़ याचवेळी पोलिसांची कसब पणाला लागली़ या दोघांच्या दौºयावेळेस कोणत्याही प्रकारचा गालबोट लागला नाही की लावू दिला नाही़ याची देखील तितक्याच गंभीरपणे दखल घेणे गरजेचे आहे़ होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवेळी अशाप्रकारचे चोखपणे नियोजन पोलिसांकडून झाले पाहीजे़ त्यासाठी आत्तापासूनच प्रातिनिधीक स्वरुपात निवडणुपूर्व रंगीत तालीम करण्याची आवश्यकता आहे़
त्याचप्रमाणे निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ़ छोरींग दोर्जे यांच्या आदेशानंतर जिल्ह्यातील काही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़ ही प्रक्रिया स्वाभाविक असलीतरी त्यांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शक सूचना देणेही आवश्यक आहे़ तसेच कोणता भाग संवेदनशिल आणि कोणता भाग अतिसंवेदनशिल आहे, याची चाचपणी आत्तापासूनच करुन घेतल्यास पुढे होणारा अनर्थ वेळीच टळू शकेल, एवढेच!