मूर्तींचा शब्दलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:45 PM2018-02-02T12:45:47+5:302018-02-02T12:46:32+5:30

बुक शेल्फ : नांदेडचे संशोधक प्रा. डॉ. किरण देशमुख यांच्या मूर्तिशास्त्रावरील ‘मराठवाड्यातील देवतांची रूपे’ या शोधग्रंथाचे प्रकाशन रविवार, २८ रोजी नांदेड येथे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. गो.बं. देगलूरकर यांच्या हस्ते होत आहे. यानिमित्त समीक्षण...

words about statues | मूर्तींचा शब्दलेख

मूर्तींचा शब्दलेख

googlenewsNext

- डॉ. बा.दा. जोशी

प्राचीन काळापासूनच देखीव मंदिरे, कोरीव मूर्ती आणि लेणी यांनी जागोजाग सजलेला/नटलेला गोदातीरीचा मराठवाडा कलास्थापत्याच्या दृष्टीने अन्य प्रदेशांपेक्षा अधिकच समृद्ध असून, येथे ‘दृष्ट लागण्याएवढी श्रेष्ठ’ असलेली देवालये प्रत्येक जिल्ह्यात असून, ‘तुज पाहता लोचनी, दृष्टी न फिरे माघारी’ या उक्तीची प्रचीती देणार्‍या सर्वच धर्मपंथांच्या देवमूर्तीही आहेतच. मंदिरे आणि मूर्ती प्राचीन संस्कृतीची ओळख देत असतात. स्वत:च्या लेखणीने अनमोल अशा शिल्पाकृतींना बोलके करणार्‍या डॉ. किरण देशमुख यांनी ‘मराठवाड्यातील देवतांची रूपे’ या मूर्तिशास्त्रावरील अतिशय उपयुक्त अशा ग्रंथात मराठवाड्यातील हिंदू, जैन व बौद्ध या तिन्ही पंथांच्या सर्व स्वरूपांतील देव प्रतिमांचा वेध घेतला आहे.

स्थापत्यकलेची गूढ भाषा व मराठीतील संत साहित्य यांचा सुरेख समन्वय साधून ग्रंथाच्या प्रारंभालाच ग्रंथलेखनाचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. ग्रंथाचे ऐतिहासिक मूल्य स्पष्ट करणारी डॉ. गो.बं. देगलूरकरांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना ग्रंथाला लाभली आहे. या शोधग्रंथाचे संशोधकीय महत्त्व वाढविणार्‍या ८८ मूर्तींच्या छायाचित्रांची फलक-सूची योग्य स्वरूपात दिली आहे. ग्रंथाच्या पहिल्याच प्रकरणात अभ्यास काळ व प्रदेशातील प्राप्त शैव प्रतिमांचा मागोवा घेताना स्वत: अनेक ठिकाणी १० ते १५ कि.मी. डोंगरदर्‍यात धुंडाळलेल्या दुर्मिळ शिवलिंगे व शिवमुखलिंगांची तसेच, एकमेवाद्वितीय ठरणार्‍या द्वादशशिवलिंग (मानवत), अष्टोत्त्रशत शिवलिंग (महापूर) आणि लिंगोद्भव (औंढा) या दुर्मिळ मूर्तींची माहिती दिली आहे. याच प्रकरणात संशोधकाने येथील सामान्य व विशेष प्रकारातील अनेक स्थिती व स्वरूपांतील कैलासाधिपती शिव शब्दबद्ध करीत असताना येथील केवल, उमामहेश्वर, हरगौरी, हरदुर्गा, चंद्रशेखर इ. मूर्तींची सुरेख नोंद घेतली असून, अनुग्रह प्रकारातील रावणानुग्रह शिल्पपटाचे वर्णन करताना वेरूळपासून ते मार्कण्डीपर्यंतच्या व्हाया-औंढा-शिवोपासक लंकाधिपतीचे शिल्पांकन कथेसह समजावून देताना त्यातील विविधतेच्या आधारे रावणाची शिवपूजा शतकानुशतकांपासून अद्यापही अशी सुरूच आहे. याचे मोठे मार्मिक विवेचन करून स्वत:च्या संशोधनाचे ‘तुलनात्मकता’ हेच ठळक वैशिष्ट्य असल्याचे दर्शविले आहे.

पशुपतीनाथाच्या संहार रूपाचा माहिती देताना अंधकारसूर, गजहासुरवधाच्या  शिल्पाची दखल घेतल्यावर, दक्षिणामूर्ती प्रकारात ध्यानमग्न शिवाला शब्दबद्ध करून त्याच्या मनोवेधक नृत्यशैलीतील अनेक ठिकाणच्या प्रतिमांची माहिती देऊन, मिश्रमूर्ती प्रकारात महादेवाच्या चित्तवेधक अर्धनारीश्वर, हरिहर या रूपाचीही उत्कृष्टपणे ओळख दिली आहे.गंगाधराच्या अन्य प्रकारातील मूर्तीसंबंधात सदाशिव (औंढा), कृषभारूढ (रामलिंगमुदगड), द्वादशसर्वपार्श्वमुख, पंचब्रह्म, कल्याणसुंदर (औंढा), कंकाल (बीड), त्रिपुरांतक (माणकेश्वर) इत्यादी प्रतिमांची माहिती देताना महाकाव्यांचा आधार घेतला असून, औंढ्याच्या तिन्ही भव्य प्रतिमांतील शंकर महायोगी नसून, तो पंचब्रह्मांपैकी वामदेव, तत्पुरुष व अघोर असल्याचे प्रथम स्पष्ट करून शोधकार्यात नावीन्य असावेच लागते, हे सूचित केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी महेशाच्या भैरव रूपाचीही चांगली दखल घेऊन शैव देवतांच्या माहितीत महिषासुरमर्दिनी, दुर्गा आणि एकमेव अशा ज्येष्ठा (मुखेड) देवीचाही परिचय दिला आहे.

दुसर्‍या प्रकरणात अभ्यासकाने वैष्णव मूर्तींचा परामर्ष घेताना चतुर्विशती प्रकारातच पुरुषोत्तमपुरीचा (जि. बीड) विष्णू पुरुषोत्तम कसा नाही? आणि पैठणचा काळभैरव  जनार्दन कसा आहे? याविषयी मूर्तिशास्त्राआधारे योग्य खुलासा करून त्या-त्या ठिकाणच्या देवांविषयी जनमानसात असणारे समज ‘गैरसमज’ ठरवून प्रस्थापितांना मोठे धक्केच दिले. त्यातून प्रामाणिक व शास्त्रशुद्ध संशोधनामुळेच अनाकलनीय देवसृष्टीचे खरे रूप समजून घेण्यासाठी मूर्तिशास्त्र कशी मदत करते? याचे उत्तर मिळते.विश्वंभराने मोहिनीरूपात भस्मासुराचा (धर्मापुरी) आणि मधुकैटाचा (औंढा) कसा वध केल्याचे सांगून, वेरूळच्या ह.भ.प. विनायकबुवा टोपरे महाराजांच्या मठातील हरिहर ‘इंद्राविष्णू’ कसा आहे? याची माहिती दिली आहे. वैष्णव देवतांचेही वर्णन अचूकच ठरते.

तिसर्‍या प्रकरणात शोधकर्त्याने इतर देवदेवतांमध्ये शिराढोणचा (जि. नांदेड) परमेश्वर ब्रह्मदेव असल्याचे पटवून, इंद्र, सूर्य व गणपतीची माहिती देताना उच्छिष्ट (औंढा व उटीब्रह्मचारी) आणि संहारी (धर्मापुरी) या वेगळ्याच रूपातील गणेशाचे वर्णन करून चौफेर शोधकार्याचा परिचय दिला आहे. येथेच डॉ. देशमुखांनी स्कंद, दिक्पाल, नवग्रह, मातृकांच्या मूर्तींची माहिती देऊन, चौथ्या प्रकरणात जैन व बौद्ध प्रतिमांचीही नोंद घेतलीच आहे.
मूर्तींच्या परिचयासाठी आवश्यक तेथे पुराणादिवाङ्मयातील संदर्भ देणे, अनेक मूर्तींच्या संबंधातील पूर्वसुरींच्या मतांचा आदर कायम ठेवून अनेकांची मते चूक असल्याचे सिद्ध करणे, मूर्तींच्या विवेचनात वास्तवता आणि विश्लेषणात तुलनात्मकता असणे, मूर्तींचे सूक्ष्मातिसूक्ष्म दृष्टीने निरीक्षण करणे, गहन मूर्तिशास्त्र व गूढ मूर्तींच्या आकलनासाठी ग्रंथलेखन लोकभाषा मराठीतच करणे, स्वच्छ मुद्रण, स्पष्ट छायाचित्रे, विषय स्पष्ट करणारी अर्थपूर्ण मुख/मलपृष्ठे, व्याकरणदृष्ट्या मजकूर निर्दोष करण्याचा केलेला प्रयत्न तसेच सादर केलेली महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ सूची या सर्वांमुळेच प्रस्तुत वाचनीय व प्रेक्षणीय झालेला ग्रंथ मराठवाड्यातील कलादेवीच्या कंठातील सुंदर कंठमणीच झाला आहे. लेखक व प्रकाशकाचे अभिनंदन!

- मराठवाड्यातील देवतांची रूपे
- लेखक : डॉ. किरण देशमुख
- निर्मल प्रकाशन, नांदेड

Web Title: words about statues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.